ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असतानाच नितीश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आगामी एक आठवड्यासाठी कोरोना निर्बंधात सूट दिली आहे. राज्य सरकारने 16 जून म्हणजेच उद्यापासून अनलॉक 2 लागू करण्यात आला आहे. नवीन निर्देशांसह आता उद्यापासून 22 जूनपर्यंत निर्बंधामध्ये सूट दिली आहे. या अंतर्गत आता सरकारी आणि खाजगी कार्यालये सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवली जाणार आहेत.

याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, उद्या पासून नाईट कर्फ्यूमध्ये आणखी एक तास सूट दिली जाणार आहे. आता सायंकाळी 7 ऐवजी 8 वाजल्यापासून सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू जारी असणार आहे. यासोबतच सर्व दुकाने सकाळी 6 ते सायंकाळी 5 या वेळेत एक दिवसाआड उघडली जाणार आहेत.
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार शैक्षणिक संस्थांसह सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे.









