ब्राह्मणांपासून देवीदेवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी
वृत्तसंस्था/ पाटणा
हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी ब्राह्मण आणि देवीदेवतांना शिवीगाळ केल्याने वादात सापडले आहेत. तसेही मांझी हे सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यासाठी राज्याच्या राजकारणात ओळखले जातात.
पाटण्यात भुइयां मुसहर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मांझी या संमेलनात मुख्य अतिथी म्हणून सामील झाले. येथील भाषणादरम्यान मांझी यांनी ब्राह्मणांसाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. ‘सध्या गरीब वर्गातील लोकांमध्ये धर्माची जाणीव अधिक होतेय. सत्यनारायण पूजा आम्हाला माहितीच नव्हती असे म्हणत त्यांनी ब्राह्मणांबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.
भगवान रामाबद्दलही मांझी यांनी स्वतःचे विचार मांडले आहेत. रामाला मी मानत नाही. राम हा काल्पनिक आहे. आम्ही मूर्ती पूजक असून पिढीला पुजतो. राम हा कुठलाच देव नाही. रामायणातील अनेक गोष्टी शिकविण्यायोग्य आहेत. परंतु राम हा देव होता हे मानण्यास आम्ही तयार नसल्याचे म्हणत मांझी यांनी वाद ओढवून घेतला आहे.
वाद वाढल्यावर पाटण्यातील स्वतःच्या निवासस्थानी स्पष्टीकरण देताना मांझी यांनी ब्राह्मणांसाठी नव्हे तर स्वतःच्या समाजातील लोकांसाठी शिव्यांचा वापर केला होता. जर कुठलाही गैरसमज निर्माण झाला असल्यास मी माफी मागतो असा युक्तिवाद केला आहे.
मांझी यांच्या या वादग्रस्त विधानांप्रकरणी भाजप अन् संयुक्त जनता दलाने त्यांना अशाप्रकारची कृती टाळण्याचा सल्ला दिला आहे. तर लोजपने याप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच लक्ष्य पेले आहे. तर मांझी हे रालोआत गेल्यापासून ते अशाप्रकारची विधाने करू लागल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात आली आहे.









