ऑनलाईन टीम / पटणा :
राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांची कोरोनाची टेस्ट बुधवारी पॉझिटिव्ह आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रघुवंश सिंह यांची मंगळवारी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना पटणा येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि बुधवारी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पहिल्यापासून मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रघुवंश सिंह यांच्यावर पाटणातील एम्स रुग्णालयातील क्वारंटाइन वाॅर्डमध्ये उपचार सुरू आहेत. एम्स रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रमणी सिंह यांनी सांगितले की, रघुवंश सिंह यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
रघुवंश सिंह यांच्या जवळचे सहकारी केदार यादव यांनी सांगितले की, रघुवंश सिंह यांना डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मंगळवारी दुपारी चार वाजता त्यांना पाटणातील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.