प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य सरकार सामान्य दुकाने आणि डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये दारू विक्रीस परवानगी देण्याची योजना आखत आहे. अशा प्रकारे खुल्या बाजारात दारूची विक्रीचे घातक परिणाम होतील, अशी चिंता जमात-ए-इस्लामी हिंदच्या महाराष्ट्र शाखेने व्यक्त केली आहे. बिहार, गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही संपूर्ण दारू बंदी करावी, अशी मागणीही केली आहे.
जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष रिझवानूर रहमान खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे ः दारू ही सर्व वाईट गोष्टींचे कारण आहे. दारू आणि जुगारामुळे महाराष्ट्रासह जगातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी दोन लाख साठ हजार भारतीय मद्यपान केल्याने मरतात. यापैकी एक लाख रस्ते अपघातात आपले प्राण गमावतात, तीस हजार कर्करोगामुळे आपले प्राण गमावतात आणि एक लाख चाळीस हजार लोक यकृत निकामी झाल्यामुळे मरतात. घरगुती हिंसा आणि इतर गुह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मद्यपान हे एक कारण आहे. सामान्य ठिकाणी मद्य विक्री केल्याने भविष्यात इतर प्रकारच्या दारूच्या विक्रीचा पूर येईल. या सर्व गंभीर बाबींचा विचार करून राज्यात संपूर्ण दारूबंदी करावी, असेही पत्रात नमूद केले आहे.
Previous Articleअभियांत्रिकी सीईटीची नोंदणी पुन्हा सुरू करा
Next Article शिवाजी विद्यापीठातर्फे 50 गुणांची मॉकटेस्ट आजपासून









