वार्ताहर / कणकवली:
करंजेत बिबटय़ाचा अद्यापही खुलेआम वावर सुरू आहे. चार दिवसांपूर्वी तेथील गुरांना लक्ष केल्यानंतर करंजे-गावठणवाडी येथे पुन्हा त्याच भागात दोन बिबटे गुरुवारी रात्री 9.15 वा. ग्रामस्थांच्या दृष्टीस पडले. ग्रामस्थांच्या आरडाओरडीनंतर दोन्ही बिबटे तेथून पसार झाले. बिबटय़ांच्या वस्तीच्या दिशेने सुरू असलेल्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. बिबटय़ांना बंदिस्त करून अभयारण्यात सोडण्याची मागणी करंजे सरपंच मंगेश तळगावकर यांनी केली आहे.
चार दिवसांपूर्वी करंजे-गावठणवाडी येथे वासराला बिबटय़ाने ठार मारले होते. त्यानंतर वन विभागाने रात्री गावात गस्त घातल्याचे सांगण्यात येते. मात्र, गुरुवारी रात्री करंजे-गावठणवाडी येथे काही ग्रामस्थांना बिबटय़ांचे दर्शन झाले. ग्रामस्थांनी एकत्र येत आरडाओरड करत बिबटय़ांना हुसकावून लावल्याचे तळगावकर यांनी सांगितले.
याबाबत तळगावकर यांनी फोंडाघाट क्षेत्राचे वनपाल शशिकांत साटम यांचे या घटनेकडे लक्ष वेधले. साटम यांनी, रात्रीच्यावेळी करंजेत ज्या भागात बिबटय़ाचे वास्तव्य आढळले, तेथे गस्त घालून त्यांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितल्याची माहिती तळगावकर यांनी दिली.









