वनविभाग ग्रामपंचायत प्रशासनाकडून वसंतगड परिसराची पाहणी
प्रतिनिधी/ उंब्रज
तळबीड ता.कराड येथील वसंतगड येथे एकाचवेळी दोन बिबटय़ांचे दर्शन झाल्याने शेतकयांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत तरुण भारतने सचित्र वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सोमवारी वनविभागाच्या कर्मचायांनी ग्रामपंचायत प्रशासनासोबत वसंतगड परिसराची पाहणी केली. या परिसरात पिंजरा लावून बिबटय़ाला पकडण्याच्या दृष्टीने वनविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.
दोन दिवसापूर्वी वसंतगड डोंगर परिसरात दोन बिबटे एकत्रित फिरत असताना युवकांनी मोबाईलवरुन चित्रीकरण क केले होते. याबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सोमवारी तातडीने सकाळी वनविभागाचे वनपाल रमेश कुंभार, वनरक्षक दिपाली अवघडे, सहाय्यक वनरक्षक शंभूराज माने तसेच सरपंच जयवंतराव मोहिते, ग्रामसेवक प्रमोद ठोके ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांनी पाहणी करुन बिबटय़ा पकडण्यासाठी पिंजरा लावण्याबाबत चर्चा केली. सरपंच जयवंतराव मोहीते म्हणाले, तळबीड व परिसरात गेल्या अनेक वर्षापासून बिबटय़ाचे वास्तव्य आहे त्यामुळे ग्रामस्थ व शेतकयांना भीती असून आजवर बिबटय़ाने अनेक पाळीव जणावरांवर हल्ला केला आहे. शिवाय तळबीड हे ऐतिहासिक गाव असून येथे पर्यटक व दुर्गप्रेमी येत असतात मात्र बिबटय़ाच्या वावराने असुरक्षित वातावरण आहे. त्यामुळे बिबटय़ास पकडून त्यास सुरक्षित ठिकाणी हलविणे गरजेचे आहे.









