ट्रप कॅमेऱयात फुटेज कैद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास, वनविभागाला यश
प्रतिनिधी /बेळगाव
हनुमाननगर येथील रेसकोर्स परिसरात बिबटय़ासदृश प्राणी निदर्शनास आल्याने वनविभागाच्या पथकाने तीन दिवसांपासून शोध मोहीम हाती घेतली होती. अखेर परिसरात बसविण्यात आलेल्या टॅप कॅमेऱयात शनिवारी रात्री रानमांजराचे फुटेज कैद झाल्याने वनविभागाने तो बिबटय़ा नसून रानमांजर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
येथील रेसकोर्स (गोल्फ मैदान) परिसरात गुरुवारी सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना बिबटय़ासदृश प्राण्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने तातडीने दाखल होऊन शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर देखील वनविभागाच्या हाताला काहीच लागले नव्हते. रविवारी सकाळी वनखात्याच्या विशेष पथकाने रेसकोर्स परिसरात दाखल होऊन बसविलेल्या टॅप कॅमेऱयाची पाहणी केली. या टॅप कॅमेऱयात रानमांजर असल्याचे स्पष्ट झाले. तीन दिवसांपूर्वी बिबटय़ासदृश प्राणी निदर्शनास आल्याने मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक धास्तावले होते. मात्र निदर्शनास आलेले रानमांजर असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. तसेच या परिसरात मोठय़ा प्रमाणात वृक्षांची संख्या असल्याने रानमांजरे आढळतात. तसेच ट्रप कॅमेऱयात आढळलेले रानमांजरदेखील मोठय़ा आकाराचे असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
यावेळी डीएफओ हर्षा बानू, एसीएफ एम. बी. कुसनाळ, आरएफओ शिवानंद मगदूम, काकती आरएफओ नागराज भीमगोळ, भुतरामहट्टी आरएफओ राकेश अर्जुनवाड, उपवनक्षेत्र अधिकारी विनय गौडर आदींच्या उपस्थितीत बसविलेल्या टॅप कॅमेऱयाची पाहणी केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱयांनी तो बिबटय़ा नसून रानमांजर असल्याचे स्पष्ट केले.
बिबटय़ासदृश प्राण्याच्या शोधासाठी रेसकोर्स परिसर पिंजून काढला होता. शिवाय 7 ट्रप कॅमेरे देखील बसविले होते. शिवाय परिसरात सापळा रचून भक्ष्य म्हणून परिसरात बकरी व कुत्री बांधली होती. पावलांच्या ठशांचा शोध देखील घेण्यात आला होता. मात्र काहीच आढळले नव्हते. अखेर शनिवारी रात्री ट्रप कॅमेऱयात रानमांजराचे फुटेज कैद झाले. त्यामुळे निदर्शनास आलेला तो बिबटय़ा नसून रानमांजरच असल्याचे स्पष्ट झाले.









