चार हजार मजुरांना जिल्हा पुरवठा विभागाकडून वितरित : प्रती व्यक्ती पाच किलो देणार तांदूळ : आदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईपर्यंत जून उजाडला
दिगंबर वालावलकर / कणकवली:
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजूर व ज्यांना शिधापत्रिका मिळालेल्या नाहीत, असे रेशनकार्ड नसलेल्या व्यक्ती उपाशी राहू नयेत, या उद्देशाने शासनाच्या आदेशानुसार जिल्हय़ात तालुकानिहाय एकूण 50 टन मोफत तांदूळ वितरित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ात असलेल्या परप्रांतीय मजूर व रेशनकार्ड नसणाऱयांना हे धान्य वितरित करण्यात येणार आहे. याबाबतचा डाटा तालुकास्तरावरून घेण्यात आला असून त्यानुसार हे वाटप होत असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. जिल्हय़ातील रेशनकार्ड नसणाऱया 4322 मजूर व लाभार्थ्यांना हे धान्य देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मे व जून महिन्यासाठी प्रती व्यक्ती प्रती महिना पाच किलो याप्रमाणे तांदूळ वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. जिल्हा पुरवठा विभागाकडून याबाबत तालुकानिहाय मजुरांची माहिती घेण्यात आली. मात्र, ही माहिती संकलीत होऊन त्या मोफत तांदळाचे प्रत्यक्षात वितरण होईपर्यंत अनेक मजूर आपल्या गावी परतल्याने आता असलेल्या मजुरांना हे धान्य रेशन दुकानादारांमार्फत वितरित करण्यात येणार आहे. मात्र, यात केवळ मजूरच नाहीत, तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शिधापत्रिकेसाठी अर्ज केला पण शिधापत्रिका मिळाली नाही, अशांनाही हे प्रत्येकी 5 किलो तांदूळ द्यावे लागणार आहेत.
तालुकानिहाय धान्य वितरण
लॉकडाऊनमुळे जिल्हय़ात अडकलेल्या मजुरांचा डाटा पुरवठा विभागाने घेतला होता. त्यानुसार जिल्हय़ात 4322 मजूर होते. त्यांना तालुक्यातील रेशन दुकानांमार्फत हे धान्य वितरित करण्यात येणार आहे. ज्या भागात हे मजूर राहतात, तेथील रेशन दुकानदारांकडे हे धान्य वितरित करण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय मोफत तांदूळ पुरवठा करण्यात आला आहे. यात सावंतवाडी 2.5 टन, दोडामार्ग 5.6, वेंगुर्ले 1.1, कुडाळ 11.6, कणकवली 11.8, मालवण 5, आचरा 2, देवगड 3.5, विजयदुर्ग 3 व वैभववाडी 3.9 असे एकूण 50 टन मोफत तांदूळ तालुक्यांना वितरित करण्यात आला आहे.
धान्य येईपर्यंत जून उजाडला
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात अनेक मजुरांच्या हाताचे काम गेल्याने त्यांना येथेच अडकून राहवे लागले होते. रोजगाराची संधी नसल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. याबाबत राज्यभरात परप्रांतीय मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा शासनाकडून प्रत्येकी 5 किलोप्रमाणे मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मे व जून महिन्यासाठी हा शासन आदेश असताना अशा मजूर किंवा रेशनकार्ड नसणाऱयांची माहिती घेईपर्यंत जून महिना उजाडला. त्यामुळे आता या मजुरांना या दोन महिन्यांचे धान्य शासनाकडून पुरवठा करण्यात येणार आहे.
मजुरांची संख्या कमी होण्याची शक्यता
तालुकास्तरावरून महिनाभरात ही माहिती घेतल्यानंतर याच कालावधीत केंद्र व राज्य सरकारकडून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी श्रमिक रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे आता या मोफत तांदळाचे वाटप करताना मजुरांची संख्या अजून कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता प्रत्यक्षात जिल्हय़ात असलेल्या मजुरांनाच हे धान्य वितरित करण्यात येणार आहे.
दोन्ही महिन्यांचे धान्य एकाचवेळी देणार!
याबाबत पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, मे व जून महिन्याचे धान्य रेशनकार्ड नसणाऱयांना देण्याचे आदेश होते. त्यानुसार डाटा घेण्यात आला. मात्र, लॉकडाऊनमुळे पुरवठा विभागाकडेच तांदूळ येण्यास उशीर झाला. त्यामुळे मे महिना गेला. मात्र, धान्य मिळण्यास उशीर झाला, तरी मे व जून दोन्ही महिन्यांचे धान्य एकाचवेळी या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे जरी महिना संपला, तरी शासनाच्या धोरणानुसार रेशनकार्ड नसणाऱया प्रती व्यक्ती, प्रती महिना या नुसारच हे धान्य वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.









