काश्मीरचा झेंडा मिळविल्याखेरीज कोणत्याही ध्वजाला न मानण्याची घोषणा, संतप्त प्रतिक्रिया
वृत्तसंस्था / जम्मू
चौदा महिन्यांच्या स्थानबद्धतेनंतर मुक्त करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीरच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी भारताविरोधात प्रक्षोभक भाषा करण्यास सुरवात केली आहे. काश्मीरच्या स्वतंत्र ध्वजाशिवाय इतर कोणताही ध्वज आपण मानत नाही. काश्मीरचा स्वतंत्र ध्वज आम्हाला पुन्हा मिळाल्यानंतरच इतर ध्वजांचा मान ठेवला जाईल, असे विधान त्यांनी केले. त्यांचा रोख स्पष्टपणे ‘तिरंग्या’ वर होता.
इतर ध्वजांना आपण स्पर्षही करणार नाही, तसेच त्यांना वंदनही करणार नाही. काश्मीरला त्याचा स्वतंत्र ध्वज परत मिळालाच पाहिजे. तो मिळविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करणे ही आपली चूक होती. भाजपचे भूत आपण बाटलीत गाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश मिळाले नाही. आपले पिता मुफ्ती मोहम्मद सईद यांना उजव्या शक्तींच्या सामर्थ्याची माहिती होती. त्यांनी जम्मू-काश्मीर राज्य चालविण्यासाठी त्यांचे साहाय्य घेण्याचा निर्णय घेतला, असा दावा त्यांनी केला.
निवडणूक लढविणार नाही
जम्मू-काश्मीरला घटनेचा अनुच्छेद 370 परत मिळवून देण्याचा आमचा निर्धार आहे. तोपर्यंत कोणतीही निवडणडूक लढविणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ज्यांनी हा अनुच्छेद काढून घेतला, त्यांना तो परत द्यावा लागणार आहे. जोपर्यंत काश्मीरचा ध्वज आणि स्वतंत्र घटना परत दिली जात नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत आम्ही भाग घेणार नाही, अशी दर्पोक्ती त्यांनी केली. काश्मीर मुद्दय़ाच्या सोडवणुकीसाठी हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. आमची लढाई कोणत्याही पक्षाची नाही. ती राज्याच्या लोकांची लढाई आहे, असे प्रतिपादन मेहबुबा मुफ्ती यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
भाजपवर टीका
दिल्लीतील भाजप सरकार सर्व आघाडय़ांवर विफल झाले आहे. त्यामुळे त्याने अनुच्छेद 370 चा मुद्दा उकरून काढला आहे. लोकांचे लक्ष जीवनविषयक समस्यांवरून हटविण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांना मूर्ख बनविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, अशी नेहमीचीच टीका मुफ्ती यांनी या प्रसंगी केली.
तीव्र प्रतिक्रिया मुफ्ती यांच्या या प्रक्षोभक वक्तव्यावर समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र सरकारने अनुच्छेद 370 रद्द केल्याने मुफ्ती यांच्यासारख्या राजकारण्यांची दुकाने बंद होण्याची वेळ आली आहे. इतके दिवस भारत सरकारच्या बोटचेप्या धोरणांमुळे शिरजोर झालेले हे नेते आता उघडय़ावर पडले. भारत सरकार पुरवित असलेल्या पैशाच्या जोरावर यांचे राजकारण चालत होते. ते लाड आता बंद झाले. त्यामुळे खवळलेल्या या नेत्यांनी लोकांना भडकावण्यासाठी भारताविरोधात विष ओकण्यास प्रारंभ केल्याची









