मूळ जामसंडेच्या अमजद खानने दिली सौदीमधील सक्त अंमलबजावणीची माहिती
प्रशांत वाडेकर / देवगड:
कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर ओढवले आहे. नोकरीनिमित्त असलेले आपले अनेक
भारतीय बांधव विविध देशांमध्ये कोरोनाचा सामना करीत आहेत. प्रत्येकाला आपल्या भारतीय
बांधवांची काळजी लागून राहिली आहे. असाच म
tळ देवगड तालुक्यातील जामसंडे कावलेवाडी येथील अमजद अबीद खान हा तरुण
सौदी अरेबिया येथील दमाम या शहरात नोकरीनिमित्त राहत आहे. तेथील कोरोनाबाबतची स्थिती
व तेथील प्रशासनाकडून कशा पद्धतीने परिस्थिती हाताळली जात आहे, तेथील लोक कशी काळजी
घेतात, याबाबत ‘तरुण भारत’शी बोलताना दिलेली माहिती.
अमजदने सांगितले की, सौदीमध्ये आतापर्यंत 2795 कोरोना बाधित आहेत. अर्थात ही स्थिती दोन दिवसांपूर्वीची आहे. त्यातील 615 लोक बरे झाले आहेत, तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. येथील सर्व न्यूज पेपर बंद असल्यामुळे अपडेट मिळत नाही. मिळालेल्या माहितीप्रमाणे भारताच्या खालोखाल सौदीची स्थिती आहे. तरीदेखील सौदी प्रशासनाने खूप कठोर पावले उचलली आहेत. सौदीमध्ये कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर येथील प्रशासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली. एकदम लॉकडाऊन न करता पहिल्यांदा सकाळी एक तास, त्यानंतर दुसऱया दिवशी दोन तास, तर तिसऱया दिवशी चार तास अशी लॉकडाऊनमध्ये वाढ करीत आता 24 तास लॉकडाऊन केले आहे.
टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन केल्यामुळे कुठेही खरेदीसाठी गर्दी झालेली दिसून येत नाही. उलट येथील लोकांना याची कल्पना मिळाल्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनावश्यक वस्तू आधीच घेऊन ठेवल्या. या 24 तासाच्या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू व मेडिकल स्टोअर्स फक्त सुरू ठेवण्यात आले आहेत. तसेच हॉटेलमधून केवळ ऑर्डरनुसार पार्सल दिले जाते. तसेच ए. सी. दुरुस्ती करणाऱयाला परवानगी दिलेली आहे. मात्र, नवीन एसी विक्रीसाठी मनाई करण्यात आली आहे.
प्रत्येक मेसेजवर शासनाचे लक्ष
शहरात लॉकडाऊनचा संदेश हा प्रत्येकाच्या मोबाईलवर पाठविला जातो. त्यामुळे कधीपासून कधीपर्यंत लॉकडाऊन असणार आहे, हे प्रत्येकाला समजते. लॉकडाऊन काळात बाहेर फिरताना कोणी आढळला, तर त्याला थेट तुरुंगात टाकले जाते. त्यामुळे रस्त्यावर कोणी फिरण्याची हिंमत करीत नाही. तसेच कोरोनासंदर्भात कोणी कुणाला मेसेजही पाठवायचे नाहीत. प्रत्येकाच्या मेसेजवरही शासनाने लक्ष ठेवलेला आहे. त्यामुळे येथे अफवा पसरविल्या जात नाहीत. तसेच येथील शासनाने प्रत्येकाला वेगळय़ा खोल्यांमध्ये राहण्यासाठी सांगितलेले आहे. ज्या कंपन्यांमध्ये भारतीय लोक कामाला आहेत, त्या कंपन्यांनी प्रत्येकाला स्वतंत्र खोली राहण्यासाठी देलेली आहे. तसेच सर्व कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
स्थानिक यंत्रणेला कळवूनच घराबाहेर पडतो!
येथील प्रशासन कडक असल्यामुळे शासनाच्या सूचनांचे सर्वजण पालन करतात. कुठल्याही दुकानासमोर दोन व्यक्तींशिवाय माणसे दिसत नाहीत. प्रत्येकाने स्वत:च घराबाहेर न पडण्याचे ठरविल्याने व शिस्त पाळल्याने येथे कोरोनाचा जास्त प्रसार अजून तरी झालेला नाही. जगभरातील मुस्लिम बांधवांचे धार्मिकस्थान असलेले ‘मक्का’ हे देखील बंद करण्यात आले आहे. इतर देशातील कोणालाही सौदीमध्ये प्रवेश दिला जात नाही. अशाप्रकारे येथील शासनाने कोरोनाची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. आम्ही देखील आमच्या फ्लॅटमधून बाहेर पडत नाही. गरज असेल तर स्थानिक यंत्रणेला कळवूनच बाहेर पडावे लागते.
रस्त्यावर फिरणे टाळा!
सौदीमधील प्रशासनाने योग्यवेळी निर्णय घेतला आहे. भारतातही योग्यवेळी निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र लॉकडाऊनमध्येही आपले काही भारतीय बांधव रस्त्यावर फिरत आहेत, हे खूप चुकीचे आहे. आताच सर्वांनी दक्ष राहून कोरोनावर मात केली पाहिजे. सर्वांनी एकत्र येणे टाळले पाहिजे, असे आवाहनही त्याने केले.









