पिंपरी / प्रतिनिधी :
महिंद्रा पुरस्कृत सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सतर्फे (एसएइ) आयोजित ‘बाहा’ राष्ट्रीय स्पर्धेत आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. त्याशिवाय या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या गाडीला 8 पैकी ऍक्सलरेशन, वेग, डय़ुरेबिलिटी, एन्डय़ुरन्स यांसारख्या 5 प्रकारातही प्रथक क्रमांक मिळवून विद्यार्थ्यांनी इतिहास घडविला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वाढई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फार्मसी कॉलेज प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, इंजिनिअरिंग कॉलेज उपप्राचार्या डॉ. पी. मालती, विभागप्रमुख डॉ. विनय कुलकर्णी, शिक्षक समन्वयक सुनील पाटील, तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या पथकाचा प्रमुख साकेत राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
प्रीतमपूर, मध्यप्रदेश येथील आशियातील सर्वात मोठय़ा चाचणी मार्गावर ही ‘बाहा’ स्पर्धा पार पडली. सन 2008 मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा आजघडीला राष्ट्रीय स्तरावरील ही खूप मोठी प्रतिष्ठेची मानली जाते. या स्पर्धेने महाविद्यालयीन तरुण अभियंत्यांमध्ये प्रचंड वेड निर्माण केले आहे. देशभरातील नामवंत 120 अभियांत्रिकी (आयआयटी, एनआयटी) महाविद्यालयांमधून संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सलग पाच दिवस चिखल, चढ-उतार, अनेक खड्डय़ांमधून अत्यंत खडतर मार्गावरून ही स्पर्धा चालते. त्यामध्ये आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 18 विद्यार्थ्यांच्या संघाने विजेतेपदासह अन्य पाच प्रथम क्रमांकाची बक्षिसे पटकाविली आहेत. सन 2009 पासून या कॉलेजचा संघ सहभागी होत असे.
त्यांना तब्बल अकरा वर्षांनंतर विजेतेपदाला गवसणी घालता आली. इतर 5 प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवून एक नवा इतिहास रचला आहे. या विजयी संघामध्ये संकेत राऊत याच्या नेतृत्वाखाली प्रणव खाटेकर (ड्रायव्हर मॅनेजर), अपूर्वा महिंद (उपकप्तान), सौरव इंगळे, तेजस धकटे, विशाखा कोटकर, ऋग्वेद बोपर्डीकर, अंशुल गुप्ता, श्रीकांत नखाते, केविन भोसले, विपुल जाधव, पृथ्वीराज शिंदे, अलीअबू फर्जद, निल कापडी, प्रतीक बिराजदार, वेदान्त कुलकर्णी, मृणाल दौडकर, मृणाल आरगडे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील सहभागी मुलींनी या विजेतेपदामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे, असेही प्राचार्य डॉ. वाढई यांनी सांगितले.









