खेडमधील उत्तर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला
प्रतिनिधी/ खेड
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी बेईमानी करत केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी हिंदुत्व सोडणारे उद्धव ठाकरेच खरे गद्दार आहेत. बाळासाहेबांचे हिंदुत्व आमच्याकडेच असून त्यांची शिवसेना आमच्या हाती सुरक्षित असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. आताचे सरकार सायलेंट मोडवर नसून अलर्ट मोडवर आहे. शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱया कोकणातील जनतेला कदापीही वाऱयावर सोडणार नाही, असे अभिवचनही दिले.
महाडनाका येथील गोळीबार मैदानात रविवारी सायंकाळी झालेल्या विराट सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवत काँग्रेसच्या राहुल गांधींवरही टीकास्त्र सोडले. विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी नव्हे तर कोकणासाठी भरभरून देण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेवर पेम करणारी जनता शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सभेला उपस्थित विराट जनसमुदायाने दाखवून दिल्याचे सांगताना आमदार योगेश कदम यांच्या कार्यकर्तृत्वाचे त्यांनी कौतुकही केले.

ते पुढे म्हणाले, केवळ सत्तेसाठी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दावणीला बांधणाऱया उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार व हिंदुत्वाची भूमिका सतत बदलल्यामुळेच ‘निर्णय’ घ्यावा लागल्याचे सांगताना त्यांच्याकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवण्याचे काम करत शिवसेनेला वाचवले आहे. हिंदुत्वाला डाग न लावता हा डाग पुसण्याचे कामही शिवसेनेच्या 40 आमदारांनी केले आहे. शिवसेनेला डाग लावण्याचा जो प्रयत्न झाला, तो यापुढे कदापि लावून घेणार नाही, असेही निक्षून सांगितले.
बाळासाहेब शिवसैनिकांचे दैवत होते. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणून शिवसेना वाढवत असून त्यांच्या संपत्तीचे वारसदार नसल्याचेही स्पष्ट केले. केवळ खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱयांना सुज्ञ जनता कदापि माफ करणार नाही. मिंधे सरकार व गद्दार असे हिणवणाऱयांनी आम्ही गद्दार नव्हे तर खुद्दार आहोत. आम्ही सत्तेसाठी कधीही मिंधे झालेलो नसून गद्दार म्हणताना लाच कशी वाटत नाही, असा हल्लाबोलही चढवला. ज्यांच्या गळय़ात गळे घालत आहेत, तेच एकेदिवशी गळाही दाबतील, अशी खरमरीत टीकाही शिंदे यांनी केली.
अहंकारापेक्षा जनतेचा विकास महत्त्वाचा आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा आमचा अजेंडा असल्याचे सांगताना आम्ही गाजराचा हलवा तरी दिला तुम्ही केवळ गाजरेच दाखवत बसलात, अशी टीकाही केली. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी 24 तास काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यापूर्वी वर्षा बंगला सामान्यांसाठी बंद होता. आजघडीला वर्षा बंगला साऱयांसाठी खुला आहे. कार्यकर्ते मोठे होतात तेव्हाच पक्ष मोठा होत असतो. मात्र, याची पोटदुखी उद्धव ठाकरेंना असल्यामुळेच स्वतःच्या पक्षातील नेत्यांसह आमदारांना राजकीयदृष्टय़ा संपवण्याचे पाप केल्याचा आरोपही केला.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल चढवताना जो पक्षाचा अध्यक्ष होण्याची जबाबदारी स्वीकारत नाही तो पंतप्रधान कसा काय होवू शकतो? असा टोला लगावत भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवली. कोकणातील जनता प्रेमळ व दिलेला शब्द खरा करून दाखवणारी आहे. कोकणवासियांनी शिवसेनेवर भरभरून पेम केले आहे. जनतेच्या या विश्वासाला कदापि तडा जावू देणार नाही, असे अभिवचनही दिले. आमदार योगेश कदम यांना पाडण्याची हिंमत कोणामध्येही नसून विरोधकांची अनामत रक्कम जनताच जप्त करेल, असा विश्वासही व्यक्त केला.
शरद पवार व सोनिया गांधी यांच्या मांडीला मांडी लावून पक्षाशी बेईमानी करणाऱया उद्धव ठाकरे यांनी माझ्यासह आमदार योगेश कदम यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कुटील डावपेच आखले. मात्र, सभेला जमलेल्या विराट गर्दीने भक्कमपणे पाठीशी असल्याचे जनतेनेच सिद्ध करून दाखवल्याचा टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी लगावला. आजपर्यंत कसलाही डाग लावून घेतला नाही. मरेपर्यंत मी व माझी मुले कसलाही कलंक लावून घेणार नाही, असेही ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे यांची परदेशातील संपत्तीची सगळी प्रकरणे एकदिवस बाहेर काढणार, असा गर्भित इशाराही दिला.
दोन वर्षानंतर योगेश कदमच आमदारः सामंत
5 तारखेला झालेली सभा ही कॉर्नर सभा होती. विचार देणारी नव्हती. आजच्या सभेने दोन वर्षानंतर होणाऱया निवडणुकीत योगेश कदमच आमदार असतील, हेच सिद्ध करून दाखवले आहे. दापोली मतदार संघाच्या विकासासाठी निधीची जराही कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
पक्षप्रमुखांनी शिवसेनेला संपवण्याचेच काम केलेः कदम
तत्कालीन पक्षप्रमुखांनी शिवसेनेला संपवण्याचेच काम केले असून अडीच वर्षात माझ्यावर अन्यायाची कुऱहाड उगारणाऱयांच्या वृत्तीला विराट जनसमुदायानेच चोख उत्तर दिल्याचे आमदार योगेश कदम यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार गजानन किर्तीकर, आमदार भरत गोगावले यांनीही मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी खेडसह दापोली, मंडणगड तालुक्यातील 20 हून अधिक सरपंचांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना सचिव सिद्धेश कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राहुल पंडित, संजय मोरे, नरेश म्हस्के, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, सेना नेत्या शिल्पा म्हात्रे, सतीश चिकणे, मिनार चिखले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मंडणगडमध्ये ‘एमआयडीसी’ची निर्मिती करणार
कोकणातील तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी मंडणगड तालुक्यात औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्यात येणार असून उद्योगमंत्री उदय सामंत यासाठी विशेष लक्ष देतील, असे अभिवचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंडणगड तालुक्यात एमआयडीसीची निर्मिती करण्याची केलेली मागणी मान्य करताच उपस्थित विराट जनसमुदायाने टाळय़ांच्या गजरात निर्णयाचे स्वागत केले.









