बालचमूंनी उभारला लक्षवेधी काल्पनिक किल्ला, दानशूर व्यक्ती व संस्थांकडून दिवाळीसाठी मदत
नंदकुमार तेली/कोल्हापूर
मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलात (जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना) शनिवारी मावळयांची दिवाळी साजरी झाली. निमित्त होते दिवाळीचे औचित्य साधून बालचमूंनी उभारलेला लक्षवेधी काल्पनिक किल्ल्याचे. बालकल्याण संकुलातील मुलांची दिवाळी आनंदाची होण्यासाठी दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदतीचा हात दिला आहे. तसेच अनेक लॉक डाऊननंतर मुलांना दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या पाल्याच्या घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे.
आकर्षक रांगोळया व लक्षवेधी काल्पनिक किल्ला
अभ्यंग स्नान, रांगोळी, दिप प्रज्वलीत करुन बालकल्याण संकुलातील मुलांनी दिवाळी साजरी केली. यावेळी मुलींनी आकर्षक रांगोळी काढल्या होत्या. तर मुलांनी गेल्या आठवडयाच्या परीश्रमातून बालसंकुलाच्या अंगणात काल्पनिक किल्ला उभारला आहे. यामध्ये संकुलातील 6 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे 20 पेक्षा अधिक मुलांनी सहभाग नोंदविला होता.
दिवाळीसाठी मुले आपल्या पाल्यांच्या घरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन लागू करण्यात आले होते. यामुळे मुलांना आपल्या पाल्यांना भेटता आले नव्हते. तसेच घरीही सोडण्यात आले नव्हते. मात्र दिवाळीनिमित्त बालकल्याण संकुलातील अनेक मुलांना आपल्या पाल्यांच्या घरी जाण्याची परवानगी मिळाली. यामुळे मुलांना आपल्या स्वगृही जाऊन दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेता आला. मुलांना पाल्यांच्या घरी सोडताना तपासणी करून सोडण्यात आले.
संकुलातील मुलांनी तयार केला फराळ
सध्या बालकल्याण संकुलामध्ये एकुण सुमारे 200 पेक्षा अधिक मुले-मुली आहेत. दिवाळीसाठी दानशूर व्यक्ती व सस्थांकडून मुलांची दिवाळी आनंदाची करण्यासाठी फराळ तयार करण्यासाठीचे साहित्य व पैसे संस्थेत जमा केले. कर्मचाऱयांनी या साहित्य व पैशाच्या मदतीतून मुलांसाठी फराळ तयार केला. यासाठी संकुलातील मुला-मुलींची कर्मचाऱयांना सहकार्य लाभले. बालसंकुलातील मुलांची दिवाळी आनंदाची साजरी होण्यासाठी संस्थेच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाने परीश्रम घेतले.









