वृत्तसंस्था/बार्सिलोना
ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रविवारी येथे झालेल्या सामन्यात बार्सिलोना संघाने ऍथलेटिक बिलबाओचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत आपल्या मागील पराभवाची परतफेड केली. बार्सिलोना संघाकडून खेळणाऱया अर्जेंटिनाच्या लायोनेल मेसीने आपला 650 वा गोल नोंदविला.
स्पॅनीश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऍथलेटिक बिलबाओने बार्सिलोनाचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. या पराभवाची परतफेड बार्सिलोनाने रविवारच्या सामन्यात केली. बार्सिलोना संघाकडून खेळताना मेसीने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये मिळून 650 गोल नोंदविले आहेत. बार्सिलोना संघातर्फे 20 व्या मिनिटाला फ्री कीकवर मेसीने आपला हा विक्रमी 650 वा गोल केला. बार्सिलोनाचा दुसरा आणि निर्णायक गोल अँटोन ग्रिझमनने केला. या स्पर्धेतील बार्सिलोना संघाचा हा सलग पाचवा विजय असून ते आता सरस गोलसरासरीच्या आधारे रियल माद्रीदला मागे टाकत 40 गुणांसह दुसऱया स्थानावर आहेत. ऍटलेटिको माद्रीद 50 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या सामन्यात बार्सिलोना संघातील अल्बाने नजरचुकीने आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू लाथाडून ऍथलेटिक बिलबाओला बोनस गोल बहाल केला. त्यानंतर मेसीने बार्सिलोनाला बरोबरी साधून दिली आणि ग्रिझमनने निर्णायक गोल केला.









