प्रतिनिधी / बार्शी
बार्शी भागात दिवसा व रात्री घरफोडी करणार्या आंतरराज्यीय दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. खय्युम रफिक बेग-शेख (वय 19), अमिर ऊर्फ अज्जू मुखबिर खान (वय 23, दोघे रा. संजय गांधीनगर, परभणी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. बार्शी परिसरात चोर्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे गुन्हे शाखेने घटनास्थळास भेट देवून गुन्ह्याचा तपास सुरू केला.
पथक गस्त घालत असताना परभणी येथील दोन संशयित इंडिका व्हिस्टा गाडीमधून चोरीचे सोने विक्री करण्याकरिता येरमाळामार्गे बार्शी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक बार्शी येथे थांबले असता कुसळंब रोडने आलेले चारचाकी वाहन ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मागील महिन्यात बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटलजवळ दिवसा घरफोडी करून त्यामधील मिळालेले सोने विक्रीसाठी घेवून जात असल्याची कबुली दिली. त्यांची पथकाने झडती घेतली असता त्यांच्याकडे गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालापैकी 33 ग्रॅमचे सोन्याचे दागिने सापडले. गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार व मोबाइल असा एकूण पाच लाख 56 हजार 500 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील एका आरोपीविरुध्द बीड, परभणी तसेच हैदराबाद, तेलंगणा, कर्नाटक अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने केली.