प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने 25 टन असे मोठय़ा क्षमतेचे दोन बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निविदा काढल्यानंतर त्यासाठी 5 अर्ज आले आहेत. ते 22 रोजी खोलण्यात आले. आता ते मान्यतेसाठी संबंधित समितीकडे पाठविले जातील, अशी माहिती मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्याकडून देण्यात आली आहे. सदर समिती सरकारनियुक्त असून त्यात पालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
सदर प्रकल्प सोनसडय़ावर स्थापित केले जाणार आहेत. पालिकेला दैनंदिन कचरा प्रक्रिया करण्याच्या बाबतीत सध्या समस्यांचा सामना करावा लागत असून त्यासाठी या मोठय़ा क्षमतेच्या प्रकल्पांची आवश्यकता आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येकी 25 टन क्षमतेचे दोन मिळून सुमारे 50 टन ओल्या कचऱयावर प्रक्रिया करणे पालिकेला शक्मय होणार आहे.
पालिका क्षेत्रातून सुमारे 40 टन ओला कचरा दैनंदिन गोळा होत असतो. हे दोन प्रकल्प मार्गी लागल्यास पालिकेची कचरा प्रक्रिया जाग्यावर पडू शकते. याखेरीज 5 टन क्षमतेचा बायोमिथेबेशन कचरा प्रक्रिया लघुप्रकल्पाचे काम एसजीपीडीए मार्केटमध्ये सुरू आहे. तो उभा राहिल्यावर मार्केटमधील ओल्या कचऱयावर तेथेच प्रक्रिया राबविणे शक्मय होणार आहे. 25 टन क्षमतेचे बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी 20 सप्टेंबरपर्यंत निविदा मागविण्तात आल्या होत्या. सदर प्रकल्पांत ओल्या कचऱयावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार आहे. बायोमिथेनेशन प्रकल्प उभारल्यानंतर 5 वर्षे तो चालविणे व देखभाल ठेवणे तसेच यादरम्यान पालिकेच्या कामगारांना प्रकल्पातील कचरा प्रक्रियासंदर्भात प्रशिक्षण पुरविणे अशा अटी निवेदेमध्ये समाविष्ट आहेत.









