वृत्तसंस्था/ हैदराबाद
बायोफोर इंडिया फार्मास्युटिकल्सने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (डीजीसीआय) कोविड-19 चे औषध फेविपिराविरच्या निर्मितीचा परवाना प्राप्त केला आहे. या औषधाचा वापर कोविड-19 च्या सौम्य लक्षणांच्या रुग्णांकरता केला जातो. याचबरोबर डीजीसीआयकडून भारतात ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडेंट्सचे उत्पादन व निर्यातीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.
तुर्कस्तानातील एका स्थानिक भागीदाराच्या सहकार्याने एपीआयची निर्यात करण्याची मंजुरी मिळाली आहे. भारतात उत्पादन घेण्यासाठी अनेक स्वदेशी भागीदारांशी चर्चा सुरू आहे. तर याच्या निर्यातीसाठी बांगलादेश आणि इजिप्तच्या कंपन्यासोबत बोलणी चालू असल्याची माहिती बायोफोर इंडियाने दिली आहे.
कोविड-19 महामारीने औषध कंपन्यांना सुरक्षेसंबंधी तडजोड न करताना प्रभावी उपाय लवकरात लवकर योजण्याचे आणि विकसित करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली आहे. आमचे फेविपिराविर गुणवत्तेच्या उच्च मापदंडांच्या पूर्तता करणारे आहे. उत्पादन यंत्रणा अमेरिका आणि युरोपीय महासंघाच्या नियमांचे पालन करणारी असल्याची माहिती बायोफोरचे संस्थापक आणि मुख्य वैज्ञानिक अधिकारी माणिक रेड्डी पुल्लागुरला यांनी दिली आहे.
भारत आणि तुर्कस्तानसह रशिया तसेच आखातातील काही भागांमध्ये कोविड-19 च्या विरोधात फेविपिराविर औषधाच्या वापरास मंजुरी देण्यात आली आहे. तर सद्यकाळात जगातील अन्य भागांमध्ये फेविपिराविरच्या चाचण्या सुरू आहेत. जपानमध्ये याचाच वापर सुरू आहे.
फेविपिराविर निर्मितीसाठी सर्व सामग्री देशातच तयार करण्यात आली आहे. हा एपीआय भारताला कोविड-19 च्या विरोधातील आमच्या एकजूट लढाईत मदत करणार असल्याचे उद्गार बायोफोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबू रंगीशेट्टी यांनी काढले आहेत.









