ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी नियुक्त झालेल्या जो बायडेन यांनीडेलावेयरमधील नेवार्क येथील क्रिस्टिना हॉस्पिटलमध्ये फायझरची कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. लोकांच्या मनात लसीबाबत भीती राहू नये, म्हणून त्यांनी या क्षणाचे लाईव्ह प्रक्षेपण केले.
क्रिस्टिना केअर हॉस्पिटलच्या आरोग्य सेवा प्रमुखांनी बायडन यांना करोना लसीचा पहिला डोस दिला. ‘देशात जेव्हा लोकांसाठी लस उपलब्ध असेल, तेव्हा लोक लस घेण्यासाठी तयार असावेत, म्हणून मी लाईव्ह प्रक्षेपण केले,’ असे त्यांनी म्हटले आहे. बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन यांनीही यापूर्वी लस टोचून घेतली आहे.
अमेरिकेत फायझरच्या लसीला आपत्कालीन परिस्थितीत मान्यता देण्यात आली असून, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुरुवातीच्या टप्प्यात ही लस देण्यात येत आहे. कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनातील उपराष्ट्रपती माइक पेंस आणि त्यांची पत्नी यांनीही मागील आठवड्यात लस टोचून घेतली आहे.









