कुडाळ : सातारा- जावली तालुक्यातील कसबे बामणोली आणि परिसरातील दुर्गम, डोंगराळ भागातील कोरोना बाधित रुग्णांना बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार फंडातून निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून, बामणोली येथे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी ४ लाख ८२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या दोन- तीन दिवसांमध्ये बामणोली आरोग्य केंद्रामध्ये कोविड केअर सेंटर उभारणीस प्रारंभ होणार आहे.
शिवेंद्रसिंहराजे यांनी ३० एप्रिल २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकार्यांना लेखी पत्र पाठवून बामणोली आरोग्य केंद्रामध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबतचा परिपुर्ण प्रस्ताव तयार करुन त्वरीत जिल्हा नियोजन अधिकार्यांकडे पाठवण्याच्या सुचना केल्या होत्या. तसेच त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही बामणोली येथे कोविड केअर सेंटर सुरु करावे आणि त्यासाठी आमदार फंडातून निधी घ्यावा, अशी सूचना केली होती.
शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रस्तावित सुचनेनुसार कसबे बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार फंडातून कोविड केअर सेंटर उभारणी करणे, त्यासाठी लागणारी सर्वप्रकारची यंत्रसामुग्री, साहित्य, ऑक्सिजन सिस्टीम, औषधे आणि वैद्यकीय टीम उपलब्ध करुन देणे या कामाला जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांच्या फंडातून ४ लाख ८२ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच कोविड केअर सेंटर उभारणीस प्रारंभ होणार होणार आहे.