चाचणीनंतरच अनुमती देण्याचा सरकारचा निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विकारावर 100 टक्के प्रभावी औषध तयार केल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी केल्यानंतर केंद्र सरकारने आता या औषधावर निर्बंध घातला आहे. सरकारकडून अनुमती मिळाल्याशिवाय या औषधाची जाहिरात अगर विक्री करू नये असा आदेश काढण्यात आला आहे.
बाबा रामदेव यांनी या औषधाच्या विक्रीच्या अनुमतीसाठी सरकारकडे आवेदनपत्र सादर केले आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. रामदेवबाबांच्या औषधाचे नाव ‘कोरोनिल’ असे आहे. या औषधाचे परीक्षण 280 रूग्णांवर करण्यात आले असून त्यापैकी 69 टक्के रूग्ण 3 दिवसांमध्ये तर उरलेले रूग्ण 8 दिवसांमध्ये पूर्ण बरे झाल्याचा दावा मंगळवारी रामदेव यांनी पत्रकारपरिषदेत केला होता.
बाबांच्या औषधांचे नमुने प्राप्त झाले असून त्यांचे परीक्षण करण्यात येईल. या औषधाची सुरक्षितता आणि प्रभाव पडताळून पाहिल्यानंतरच त्याला अनुमती देण्यात येणार आहे. तोपर्यंत या औषधाची जाहिरात करता येणार नाही. अद्याप केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने या औषधावर कोणतेही प्रयोग केलेले नाहीत. जोपर्यंत परीक्षण केले जात नाही व ते सकारात्मक असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत या औषधाला मान्यता देण्यात येणार नाही हे स्पष्ट करण्यात आले.









