सेन्सेक्स 486 तर निफ्टी 137 अंकांनी तेजीत: आयटी कंपन्या नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी आयटी, ऑटो कंपन्यांच्या समभागांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक विक्रमी तेजीसह बंद झाले आहेत. सेन्सेक्स 486 अंकांच्या वाढीसह तर निफ्टी 137 अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे. एचसीएल टेकने 6 टक्के इतकी तेजी दर्शवली होती. याच आठवडय़ात सेन्सेक्स 50 हजाराचा टप्पा गाठू शकतो, असा तज्ञांचा अंदाज आहे. कारण याच आठवडय़ात एचसीएल टेकसह इन्फोसिससारख्या मोठय़ा कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत.
सेन्सेक्स निर्देशांक 486.81 अंकांच्या वाढीसह 49,269.32 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 137.85 अंकांच्या वाढीसह 14,484.75 वर बंद झाला. टाटा मोटर्सच्या समभागांनी 12 टक्के सर्वाधिक उसळी घेतली. इन्फोसिस, एचडीएफसी, बजाज ऑटो, मारूती, टेक महिंद्रा आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांच्या समभागांनी तेजी दाखवली तर दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रिज, एल अँड टी, कोटक बँक आणि एसबीआय नुकसानीत राहिल्या होत्या.
अमेरिकेत नव्या प्रोत्साहन पॅकेजच्या शक्यतेने बाजारात विक्रमी स्तर राहिला आहे. कोरोना लसीच्या बातम्यांनी शेअर बाजाराला बुस्टर देण्याचे काम केले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सोमवारी सेन्सेक्सने दिवसभराच्या सत्रात एकावेळी 49,303 अंकांवर झेप घेत नवा विक्रम प्रस्थापित केला. दुसरीकडे निफ्टीनेही 14,498 अंकांपर्यंत झेप घेतली होती. दुसरीकडे जागतिक संकेतांच्या बळावर व विदेशी गुंतवणूकीच्या वाढत्या आवकेची दखल घेत सेन्सेक्स सोमवारी सकाळी 400 अंकांच्या वाढीची नोंद करू शकला. एचसीएल टेक, इन्फोसिस व एचडीएफसी या सर्वात नफ्यात राहिल्या. सेन्सेक्समध्ये 20 समभाग नफ्यात तर 10 तोटय़ात राहिले. इतर बाजारांचा विचार करता युरोपियन बाजाराने मात्र 10 महिन्यातील घसरण अनुभवली.