सेन्सेक्स 393 अंकांनी वधारला, टाटा मोटर्स, एचसीएल टेक नफ्यात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेत नव्या सरकारकडून आर्थिक पॅकेजच्या घोषणेच्या शक्यतेच्या वातावरणाचा बुधवारी शेअरबाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. ऑटो व आयटी क्षेत्रातील खरेदीच्या जोरावर बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 393.83 अंकांच्या तेजीसह तर निफ्टीचा निर्देशांक 123 अंकांच्या वाढीसह नव्या उच्चांकासह बंद झाला.
सेन्सेक्स बुधवारी 49,792.12 अंकांवर तर निफ्टी 14,644.70 अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारातील मिळताजुळता कल बुधवारी भारतीय शेअर बाजाराला उपकारक ठरला आहे. शेअर बाजार बुधवारी किंचीत तेजीसह सुरू झाला. सुरूवातीला काही मिनीटांनंतर बाजारात खरेदीचा सिलसिला दिसला. प्रारंभी आयटी कंपन्यांच्या समभागांनी तेजी दर्शवली होती. यात एचसीएल टेक व टेक महिंद्रा यांचे समभाग 2 टक्के तेजीत होते. बीएसईवर 2 हजार 832 कंपन्यांपैकी 1 हजार 617 कंपन्या तेजी दर्शवत होत्या. चौफेर तेजीनंतर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 197.61 लाख कोटी रुपये झाले होते. सेन्सेक्समधील मारूती सुझुकी, महिंद्रा आणि महिंद्रा, एशियन पेंटस् यांच्या समभागांनी तेजी दर्शवली होती. निफ्टी दिवसभरात 92 अंकांच्या वाढीसह 14,613.75 वर व्यवहार करत होता. यात टाटा मोटर्सचे समभाग 6 टक्क्यापर्यंत तेजी दर्शवत होते. विप्रोचे समभागही 3 टक्के वाढले होते. अदानी पोर्टचे समभाग 2 टक्के वधारले होते. दरम्यान दुपारी 2.20 मिनीटांनी 403 अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स निर्देशांकाने 49,802 चा विक्रमी स्तर पार करण्यात यश मिळवलं. त्यापाठोपाठ निफ्टी निर्देशांकानेही उच्चांकी स्तर गाठण्यात यश मिळवल्याचे पाहायला मिळाले. ऑटो निर्देशांक बुधवारी 2.5 टक्के इतका तेजीत होता.
2021 चा दुसरा आयपीओ
रंग उत्पादक कंपनी इंडिगो पेंटसचा आयपीओ बुधवारी बाजारात खुला झाला. यायोगे कंपनी 1 हजार 176 कोटी रुपये उभारणार आहे. आशियाई बाजार बुधवारी स्थिर होते.









