सेन्सेक्स 178 अंकांनी मजबूत : कोविड लस परिक्षणाचाही प्रभाव
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवस मुंबई शेअरबाजाराला लाभदायक ठरले आहेत. कारण प्रारंभीचे दोन दिवस बीएसई सेन्सेक्समध्ये घसरण झाली होती. परंतु नंतर मात्र बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिले. अंतिम दिवशी शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या समभागातील तेजीच्या जोरावर सेन्सेक्सने 178 अंकांची झेप घेतली आहे.
कॅडिला हेल्थकेअरच्या जायडसला कोविड 19 च्या लसीला मानवी चाचणी करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. या कारणामुळेही देशातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी बाजारात गुंतवणूक केल्याचे पहावयास मिळाले आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणून शुक्रवारी दिवसभरात सेन्सेक्स 36,110.21 चा उच्चांक गाठण्यात यशस्वी झाला आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 177.72 अंकांनी वधारुन निर्देशांक 36,021.42 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 55.65 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,607.35 वर स्थिरावला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये भारती एअरटेलचे समभाग सर्वाधिक म्हणजे 4 टक्केपेक्षा अधिकने तेजीत राहिलेत. सोबत बजाज ऑटो, टीसीएस, टायटन, एचसीएल टेक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये अमेरिकेमध्ये रोजगाराचे आकडे चांगले रहिल्यानंतर वॉल स्ट्रीटमध्ये तेजीची उसळी दिसली तर आशियाई बाजारांमध्येही तेजीचा माहोल राहिला होता. कारण कोविड 19च्या लसीची मानवी चाचणी घेण्यासंदर्भात सुरु असलेल्या घटनेचा परिणाम बहुतांश शेअर बाजाराच्या कामगिरीवर झाल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. तरी येत्या काळात सदर घटनेच्या आधारावरच बाजाराचा कल निश्चित होणार आहे.









