वार्ताहर/ जमखंडी
जमखंडीत 1 व मुधोळमध्ये 2 कोरोना रुग्ण असल्याचा अहवाल आल्याने जमखंडीतील कोरोनाबाधितांची संख्या चार तर बागलकोट जिल्हय़ात ही संख्या 24 वर पोहचली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र यांनी दिली.
मुधोळ येथे 28 वर्षाच्या युवक रुग्ण क्रमांक 455 व 14 वर्षीय मुलाला 380 च्या संपर्कातून कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच जमखंडीत 46 वर्षाच्या व्यक्ती रुग्ण क्रमांक 456 याला कोणापासून कोरोनाची बाधा झाली आहे हे स्पष्ट झालेले नाही. तो खाटिक गल्लीचा रहिवासी आहे. गेल्या चार दिवसात बागलकोट जिल्हय़ात कोरोना झालेल्या रुग्णांची नेंद झाली नव्हती. पण शुक्रवारी 2 रुग्ण आढळल्याने परत त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले. तर 30 जणांचे स्वॅब पाठविण्यात आले. आतापर्यंत जिल्हय़ात 1613 जणांचे नमूने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले असून त्यापैकी 1523 निगेटिव्ह, 23 पॉझिटीव्ह व एका व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. 61 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
बागलकोट येथे जंतूनाशक औषध फवारणी करण्याकरिता अंदाजे 13 लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक यंत्र युपीएल कंपनीने जिल्हा प्रशासनाला मोफत दिले. आमदार वीरण्णा चिरंतीमठ यांनी यंत्रणेला चालना दिली. यावेळी जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र, पालिका आयुक्त मुनिशामाप्पा, युपीएल कंपनी अधिकारी उपस्थित होते.
विजापुरात आणखी दोघांना कोरोनाची लागण
विजापूर : विजापुरात आज दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या 39 झाली आहे. गुरुवारी दोघे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. यामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेसह युवकाचा समावेश होता. त्यांच्यावर येथील इस्पितळातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.









