दोडामार्ग / वार्ताहर:
तिलारी धरण परिसरातील बाग-बगीचे उद्याने विकसित करण्यासाठी जवळजवळ 42 लाख रुपयांचा निधी आवश्यक असून शासनाकडून तो प्राप्त झाल्यानंतर बंद अवस्थेतील ही उद्याने बगीचे पूर्ववत करता येतील असे दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळा धाऊसकर यांनी पाटबंधारे विभागाचे लक्ष वेधले होते त्या संदर्भात त्यांना देण्यात आलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. तर धाऊसकर लवकरच या प्रश्नी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत.
तिलारी धरण परिसरातील तेरवण – मेढे उन्नेयी बंधारा, मुख्य माती धरणावरील दर्शन स्थळ, मुख्य धरणाच्या पायथ्याशी असलेले उद्यान तसेच विश्रामगृह या सर्व ठिकाणची उद्याने बगीचे विकसित करून ती खुली करावीत जेणेकरून धरण स्थळाला पर्यटनाचे स्वरूप येईल अशी मागणी धाऊसकर यांनी प्रकल्प प्रशासनाकडे केली होती. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचेही लक्ष त्यांनी वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ सिंधुदुर्गचे सहाय्यक अधीक्षक अभियंता नंदकिशोर बल्लाळ यांनी श्री. धाऊसकर व श्री. पटोले यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. या उद्यान बगीच्यांची दुरुस्ती करावयाची झाल्यास 42 लाख 52 हजार रुपये इतका निधी खर्च अपेक्षित असून तो मिळाल्यास पुढील कार्यवाही तात्काळ होईल असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Previous Articleकोरेगावचा वाघा घेवडा पोस्टाच्या तिकिटावर
Next Article `जमियत’चा १५ हजार पुरग्रस्त कुटुंबीयांना मदत हात









