ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजारांची आर्थिक मदत केली आहे. राज्यातील नोंदणीकृत 7 लाख 67 हजार बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात 153 कोटी 40 लाख जमा करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली.
वळसे-पाटील म्हणाले, कोरोना संकटात बांधकाम मजुरांची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य सरकारने नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये DBT पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 20 मे पर्यंत 7 लाख 67 हजार नोंदणीकृत कामगार आहेत. या बांधकाम मजुरांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये याप्रमाणे 153 कोटी 40 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जमा करण्यात आले आहे.
काही तांत्रिक अडचणींमुळे ज्या बांधकाम कामगारांच्या बँक खात्याची माहिती उपलब्ध झाली नाही, त्याची माहिती घेऊन त्या कामगारांच्या खात्यातही पैसे जमा करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.









