वार्ताहर/ मडकई
बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर होणारा वार्षिक ‘दिपोत्सव 2020’ यंदा बुधवार 18 रोजी सायंकाळी 5.00 वा. बांदोडा पंचायतीतर्फे मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग व माधवराव ढवळीकर ट्रस्टचे आधारस्तंभ मोहन ढवळीकर यांच्या हल्लीच झालेल्या निधनामुळे हा उत्सव मर्यादित स्वरुपात होणार असल्याची माहिती मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी बांदोडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी बांदोडा पंचायतीचे सरपंच राजेश नाईक, कवळे पंचायतीचे सरपंच राजेश कवळेकर आदी उपस्थीत होते. श्रीकृष्ण व लक्ष्मी पुजन, पाडवा, वसूबारस, धेंडलो हे पारंपारिक सण व उत्सव साजरे होणार असून आकाश कंदील, रोषणाई व पणत्यांची आरासही मर्यादित असेल. अन्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसून एकंदरीत उत्सव आटोपशीर असेल, याची मडकई मतदार संघ व फोंडा तालुक्यातील जनतेने नोंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे प्रत्येक पंचायतीमार्फत पणत्या वितरीत केल्या जातात. यंदा बांदोडा पंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी आठ हजार पणत्यांचे वितरण गुरूवार 12 रोजी सरपंच राजेश नाईक व त्यांचे सहकारी पंचसदस्य करतील, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हा पंचायत निवडणुका कायदा व नियमानुसार घ्याव्यात
जिल्हा पंचायत निवडणुका घेताना निवडणुकीसंबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच त्या घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला त्यांनी केली आहे. अंतिम टप्प्यातील प्रचार संपुष्टात आल्याने ही निवडणूक रद्द झाली होती. निवडणुकीचे सर्व सोपस्कार पूर्णही झाले होते. आता थेट मतदान घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. सरकारच्या घटक पक्षावर टिका करताना दक्षिण गोव्यात या पक्षाची बैठक झाली असून दिवळीच्या निमित्ताने घराघरात पाच किलो पोहे, गूळ व तीन किलो कांदे देण्याची योजना आखली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून अशी आमिषे देणे आचार संहितेचा भंग आहे, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले.
बॉक्स
गोवा राज्यातील भाजपा सरकारने गोवा हागणदारीमुक्त राज्य असल्याचे जाहीर केले आहे. चुकीची माहिती देवून सरकारने जनतेची दिशाभूल करु नये. गोव्याच्या अनेक भागात आजही कित्येक लोक रस्त्याच्या बाजूला बाटल्या घेऊन उघडय़ावर शौचास बसलेले दिसतात. चुकीची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिल्याबद्दल जनतेची माफी मागावी. असे आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. मागासवर्गीयां बरोबर अन्य समाजातील नागरिकांना शौचालय देण्यात येणार असल्याचे सांगून पंचायतीने पैसे सुध्दा भरुन घेतलेले आहे. मात्र गेले दोन तिन वर्षे झाली तरी शौचालय दिलेले नाही. आवश्यक असलेले ना हरकत दाखलेही भाटकारा कडून मिळवून पंचायतीला सादर केलेले आहे. तरी अर्जदारांना शौचालय मिळालेले नाही. जिल्हा पंचायती व विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने 11 हजार नोक-?या देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करुन जनतेची फसवणूक करीत आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने एव्हढय़ा नोक-या सरकार देवूच शकत नाही. मतांसाठी जनतेला खोटी आश्वासने मुख्यमंत्र्यांनी देवू नये असा इशारा आमदार सुदिन ढवळीकर यांनी या परिषदेतून दिला आहे.









