●सातारा आगारच्या जगताप, निंबाळकर या चालकांची कामगिरी
●अन्फाम वादळामध्ये 8 तास अडकले
●दररोज 900 किलोमीटरचा केला जात होता प्रवास
●गुगल मॅप आणि रोड एटलास पुस्तकाच्या आधारावर बस पोहचवली
●अनुभवी 53 वर्षाचे जगताप आणि नवखे निंबाळकर यांनी पाडली जोखमीची मोहीम
सातारा/प्रतिनिधी
सातारा शहरातील पश्चिम बंगाल राज्यातील असलेल्या मजुरांच्या मागणीनुसार त्यांना त्यांच्या गावी पोहचवण्याची जबाबदारी सातारा आगाराने घेतली होती. सातारा आगाराने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनुभवी असे चालक एस.टी.जगताप आणि नवखे चालक एस.एस.निंबाळकर यांच्यावर सोपवली. सलग दोन दिवस आणि रात्रीचा प्रवास करत त्या 22 मजुरांना पश्चिम बंगालमधील नुधीया या जिल्ह्यात सुखरूप पोहचवले. हा जिल्हा बांग्लादेशला जोडून आहे. साताऱ्याकडे परत फिरताना ते दोन्ही चालक बससोबत आलेल्या अनफाम वादळात आठ तास खडकपूर येथे अडकले.येवढ्या लांबच्या प्रवासाची आठवण घेऊन ते दोन्ही चालक मजल दरमजल करत दि.20 रोजी सातारच्या मायभूमीत पोहचले.
सातारा शहरात लॉक डाऊनमुळे बाहेरच्या राज्यातील मजूर अडकले होते. त्या मजुरांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार राज्य परिवहन महामंडळाच्याकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 22 जणांनी पश्चिम बंगालमध्ये असलेल्या नुधीया या जिल्ह्यात सोडण्याची विनंती केली होती. सातारा आगारचे अधिकारी संजय भोसले, रेश्मा गाडेकर यांनी एमएच 13 ई ओ 8471 ही बस पाठवण्यासाठी अनुभवी असलेले चालक एस.टी. जगताप आणि नवखे एस.एस.निंबाळकर या दोघांच्यावर सोपवली. दि.15 रोजी सगळी भराभरी करून त्या 22 जणांची तपासणी करून सायंकाळी 7.30 वाजता बस सातारा आगारातून रवाना झाली.
राज्यातले रस्ते माहिती असतात परंतु बाहेरच्या राज्यात रस्त्यांची एवढी माहिती नसली तर सोबत घेतलेल्या शिदोरीसह यांचा प्रवास सुरु झाला. बाहेर पडताना गाडीत डिझेल टाकी फुल केली होती.दोनशे किलोमीटर अंतर एकाने तर दुसरे दोनशे किलोमीटर अंतर दुसऱ्याने गाडी चालवत हा प्रवास सुरू केला. एका दिवसात 900 किलोमीटर अंतर कापले जात होते. पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी आणि थोडावेळ चेक पोस्टवर तपासण्या करण्यासाठी थांबले जात होते. तेथेच जेवण खाणे केले जात होते. तब्बल चार राज्यांच्या सीमा ओलांडून पश्चिम बंगाल येथील नुधीया या जिल्ह्यात दि 17 रोजी रात्री 12.30 ला गाडी पोहचली. त्या 22 जणांचे मेडिकल तपासणी केल्यानंतर दि.18 रोजी सकाळी 12 वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. वाटेत त्यांना ओडिशा राज्यात अनफाम या वादळात सुरक्षिततेच्या कारणास्तव थांबावे लागले. दि.20 रोजी सातारा आगारात पोहचले.
वादळामध्ये एनडीआरएफने केली मदत
परतीच्या प्रवासात बसमध्ये दोघेच चालक.बस ओडिशा राज्यात खडकपूर येथे येताच वादळाचा तडाखा सुरू झाला होता.एनडीआरएफच्या टीमने रस्ता सुरक्षित या कारणास्तव ब्लॉक करून अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, नागरिक यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. रात्री 9 ते पहाटे 4 पर्यंत हे दोन्ही चालक सुरक्षित स्थळी थांबले. तेथील पोलिसांच्या सूचनेनुसार पुन्हा त्यांनी प्रवासाला सुरुवात केली.वाटेत वादळाने काही अडचण आल्यास हेल्पलाईन नंबर दिले होते. सुदैवाने कोणत्याही अडथळा उदभवला नाही.
जेवणाची झाली चांगली सोय
राज्य परिवहन महामंडळाच्या माहितीने त्या राज्यात काय लॉक डाऊन मध्ये सुविधा मिळू शकते हे माहिती पत्रक देण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक चेक नाक्यावर जेवणाची सोय करण्यात आल्याने या दोन्ही चालकांना कोणतीही जेवणाची अडचण उदभवली नाही.त्यांच्यासोबत असलेल्या 22 प्रवाशानाही जेवण मिळाले.
गुगल मॅपचा झाला आधार
जरी जगताप हे अनुभवी चालक असले आणि जाताना त्यांच्यासमवेत तेथील 22 जण असले तरीही रस्ते माहिती नव्हते.तसेच त्यांचा 1986चे इंटरनॅशनल वाहन चालवण्याचा परवाना आहे. देशात अनेक भागात फिरल्याचा अनुभव होता. त्या करता गुगल मॅप टाकण्यात आला होता.तसेच सोबत रोड एटलास पुस्तक होते. त्याचा मोठा आधार त्यांना झाला.
साडे चार हजार किलोमीटरचा प्रवास
सातारा ते नुधीया ते सातारा हे तब्बल साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास दोन्ही बसचालकांनी केला आहे. 44 हजार रुपयांचे 863 लिटर डीझल लागले. जगताप हे 53 वर्षाचे असून ते 200 किलोमीटर तर निंबाळकर हे 200 किलोमीटर गाडी चालवत होते. चालत्या गाडीतच आराम करत होते. दररोज 900 किलोमीटर अंतर कापत होते. त्यांचा हा प्रवास आठवणीत राहणारा आहे.








