दुबई / वृत्तसंस्था
बांगलादेश क्रिकेट संघाचा पुढील महिन्यातील श्रीलंका दौरा कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे लांबणीवर टाकला गेला आहे. बांगलादेशचा संघ 3 कसोटी सामने खेळण्याकरिता लंकन दौऱयावर जाणे अपेक्षित होते. आयसीसीने आपल्या ट्वीटवर हँडलवरुन ही माहिती दिली. पुढे, बांगलादेशने आपल्या खेळाडूंची पुरेशी तयारी झाली नसल्याने दौऱयातून माघार घेतली असल्याचा दावा श्रीलंकन क्रिकेट मंडळाने एका पत्रकाद्वारे केला.
कोव्हिड-19 च्या संकटामुळेच न्यूझीलंडचा बांगलादेश दौराही लांबणीवर टाकला गेला. मंगळवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले गेले. बांगलादेशचे तीन खेळाडू अलीकडेच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. माजी वनडे कर्णधार मश्रफे मोर्तझा, नझमुल इस्लाम व नफीस इक्बाल यांचा त्यात समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, न्यूझीलंड-बांगलादेश यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दोन कसोटी सामने होणार होते. हे सामने आयसीसी विश्व कसोटी स्पर्धेचा भाग असणार आहेत.
यापूर्वी बांगलादेश क्रिकेट मंडळाने एप्रिलमध्ये पाकिस्तानचा दौरा तसेच मे मधील आयर्लंड व इंग्लंड दौराही लांबणीवर टाकला आहे. जूनमध्ये आयोजित ऑस्ट्रेलियाचा बांगलादेश दौरा देखील कोव्हिड-19 मुळेच लांबणीवर टाकण्याची वेळ आली आहे. पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळेल, त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नव्याने सुरुवात होणे अपेक्षित आहे. या दौऱयासाठी विंडीजचा संघ एव्हाना इंग्लंडमध्येच असून त्यांचा क्वारन्टाईन कालावधीही पूर्ण झाला आहे. ते लवकरच सरावाला सुरुवात करणार आहेत.









