ढाका / वृत्तसंस्था
बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू महमुदुल्लाहने बुधवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ‘कारकिर्दीच्या शिखरावर निवृत्त होण्याचा माझा नेहमीच विचार होता आणि कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याची हीच योग्य वेळ आहे’, असे महमुदुल्लाहने बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या माध्यमात जारी केलेल्या पत्रकात म्हटले. ‘कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी वनडे व टी-20 क्रिकेट प्रकारात मी यापुढेही खेळत राहणार आहे’, असे महमुदुल्लाहने नमूद केले.
बांगलादेशच्या या 35 वर्षीय दिग्गज खेळाडूने बांगलादेशतर्फे 50 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 33.49 च्या सरासरीने 2914 धावांचे योगदान दिले. यादरम्यान त्याने 43 बळीही घेतले. 51 धावात 5 बळी, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.









