ऑनलाईन बसपास प्रक्रिया किचकट, विद्यार्थी निरुत्साही, प्रक्रिया संथगतीने
बेळगाव / प्रतिनिधी
जुन्या बसपासची मुदत संपल्याने 6 सप्टेंबरपासून नवीन बसपासच्या ऑनलाईन प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मात्र बसपास मिळविण्यासाठी विद्यार्थीच निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आतापर्यंत बसपासच्या मागणीसाठी बसपास विभागात केवळ 450 अर्ज दाखल झाले आहेत. गतवर्षापासून बसपाससाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आल्याने बसपास मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थीही उत्सुक नसल्याचे दिसून येत आहेत.
कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बऱयाच काळासाठी बंद होती. त्यामुळे बसपास प्रक्रियादेखील थांबली होती. मागील महिन्याच्या अखेरपासून शाळांच्या ऑफलाईन वर्गांना प्रारंभ झाला. दरम्यान 31 ऑगस्ट रोजी जुन्या बसपासची मुदत संपली. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसपास अनिवार्य होता. परिवहनने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जुना पास आणि शुल्क पावती दाखवून प्रवास सुरू आहे. मात्र 30 सप्टेंबरला जुन्या पासची मुदत संपल्यानंतर विद्यार्थ्यांना नवीन बसपास बंधनकारक असणार आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत विद्यार्थ्यांनी नवीन बसपास मिळविणे आवश्यक आहे.
ऑनलाईन बसपास प्रक्रिया किचकट व वेळखाऊ असल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळविताना अडचणी निर्माण होत आहेत. बसपास वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थीही निरुत्साही दिसून येत आहेत. ऑनलाईन अर्ज करताना सेवासिंधू पोर्टलवर सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत असल्याने अर्ज करताना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळेच बसपास विभागात अर्ज दाखल करणाऱयांची संख्या घटली आहे. दरवषी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली की बसपास उपलब्ध करून दिला जायचा. मात्र मागील वर्षापासून कोरोनामुळे शैक्षणिक वर्षदेखील विस्कळीत झाल्याने बसपास प्रक्रियादेखील थंडावली आहे. शाळांना उशिरा सुरुवात झाल्याने बसपास प्रक्रियादेखील उशिराच सुरू झाली.









