गतवषी 6 कोटी तर यंदा आतापर्यंत 1 कोटीच महसूल
प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य परिवहन मंडळाला दैनंदिन प्रवाशांच्याबरोबर शैक्षणिक सहली, बसपास, सण-उत्सव, पर्यटनस्थळांना सोडलेल्या जादा बसेसमधून अधिक उत्पन्न मिळत असते. मात्र, कोरोनामुळे यंदाच्या अधिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शिवाय शाळाही बऱयाच काळासाठी बंद राहिल्याने बसपासच्या कामालाही स्थगिती मिळाली होती. गतवषी बेळगाव विभागाला बसपासच्या माध्यमातून 6 कोटी 13 लाख रुपये महसूल जमा झाला होता. मात्र, यंदा केवळ 1 कोटी 72 लाख रुपये इतकाच महसूल जमा झाला आहे. गेल्या वषीच्या तुलनेत परिवहनला तब्बल 5 कोटींचा फटका बसला आहे.
दरवषी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली की बसपासची प्रक्रिया सुरू होते. मात्र, यंदा शाळाच बंद राहिल्याने बसपास प्रक्रियाही लांबणीवर पडली. सध्या सुरू असलेल्या बसपास प्रक्रियेकडेही विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष संपायला काही दिवस शिल्लक असल्याने बसपास मिळविण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झालेला दिसून येत आहे. गतवषी प्राथमिक-माध्यमिक, कॉलेज-पदवी अशा 76 हजार 315 विद्यार्थ्यांनी बसपास घेतले होते. त्यामुळे महसूलही अधिक प्रमाणात जमा झाला होता. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ 18 हजार 263 विद्यार्थ्यांनीच बसपास मिळविले आहेत. त्यामुळे महसुलावर परिणाम झाला आहे.
बेळगाव शहरातील 4 आगारांसह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर अशा 7 आगारांचा बेळगाव आगारात समावेश आहे. सर्व आगारांमध्ये पासधारक विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या बसपासच्या माध्यमातून दरवषी परिवहनला कोटय़वधींचा महसूल मिळतो. मात्र, यंदा सर्वच आगारांतून बसपास घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.









