नाही परिवहनचे स्पष्टीकरण : प्रवाशांना दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने बसतिकिटाचे दरदेखील वाढतील, अशी भीती सर्वसामान्य प्रवाशांना होती. शिवाय बसतिकीट दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. बसतिकीट दरवाढ होण्याची चिन्हे असतानाच राज्य सरकारने प्रवाशांना दिलासा दिला आहे. सध्या कोणत्याही प्रकारची बसतिकीट दरवाढ होणार नसल्याचे स्पष्टीकरण परिवहनमंत्री बी. श्रीरामुलू यांनी दिले आहे.
वाढत्या महागाईमुळे आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे परिवहन मंडळ आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात सापडले आहे. त्यामुळे बसतिकीट दरवाढ होणार अशी चिन्हे दिसत होती. याबाबत शासनाकडे प्रस्तावदेखील पाठविला होता. मात्र सरकारने बसतिकीट दरात कोणतीही वाढ केली नाही. परिवहन मंडळाच्या सर्व बसेस विविध मार्गांवर धावत आहेत. त्यामुळे हळूहळू महसूलही वाढत आहे. त्यामुळे परिवहनने सध्या कोणत्याही प्रकारची तिकीट दरवाढ केली नाही.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत प्रचंड प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे प्रवाशी वाहतूक करणाऱया परिवहनसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान वाढत्या डिझेलचा खर्च, कर्मचाऱयांचे वेतन आणि इतर खर्च वाढल्याने परिवहन तोटय़ात सापडले आहे. तरीदेखील सामान्य बसच्या तिकीट दरात वाढ केलेली नाही. लॉकडाऊनपूर्वी म्हणजेच दीड वर्षापूर्वी परिवहनने तिकीट दरात 12 टक्के वाढ केली होती. मात्र त्यानंतर तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. सध्या काही प्रवाशांमध्ये तिकीट दरवाढीचा संभ्रम आहे. तर काही ठिकाणी दरवाढीच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र तिकीट दरवाढ झाली नसल्याचे स्पष्टीकरण परिवहनने दिले आहे.









