बसस्थानकात गोवा-महाराष्ट्र बस दाखल
बेळगाव / प्रतिनिधी
विविध मागण्यांसाठी परिवहनच्या कर्मचाऱयांनी पुकारलेला संप अखेर सोमवारी सकाळी मागे घेण्यात आला. बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी परिवहन मंडळाने जोर लावला असला तरी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांवर कायम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकातून हुबळी, कोल्हापूर आदी ठिकाणी मोजक्मयाच बस धावल्या. तसेच बसस्थानकात गोवा व महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसेसदेखील दाखल झाल्या होत्या.
वेतनवाढ देण्यासह सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, सरकारी नोकरांप्रमाणे सोयी-सुविधा पुरवाव्यात यासह इतर मागण्यांसाठी परिवहनच्या कर्मचाऱयांनी बसस्थानकात शुक्रवारपासून कामबंद आंदोलन छेडले होते. त्यामुळे बस वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. शनिवारी सायंकाळी बससेवा सुरू करण्यासाठी आगारातून बसेस बाहेर काढण्यात आल्या होत्या. दरम्यान, पुन्हा कर्मचाऱयांनी आक्रमक भूमिका घेतल्याने तातडीने बसेस बंद करण्यात आल्या. पोलीस बंदोबस्तात सोमवारी सकाळी बसस्थानकातून काही बसेस धावल्या. बसस्थानकात सकाळी प्रवाशांची वर्दळ वाढली होती. मात्र, दुपारनंतर बसेसअभावी प्रवाशांची संख्यादेखील कमी झालेली दिसून आली. सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी बसस्थानकाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बसस्थानकाच्या आवारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बस सुरू राहतील अशा आशेने आलेल्या प्रवाशांना केवळ मोजक्मयाच बस धावल्याने पुन्हा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. मागील चार दिवसांपासून बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दिवसभरात आलेल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बस युनियन जिमखाना येथील चंदगड बसथांब्यावरून प्रवाशांना घेऊन माघारी परतल्या. त्यामुळे चंदगड, आजरा तालुक्मयातील प्रवाशांची गैरसोय टळली. पुणे, मुंबई, बेंगळूर या शहरांकडे प्रवास करणाऱया प्रवाशांनी खासगी व्होल्वो गाडय़ांतून प्रवास केला.
गेल्या चार दिवसांपासून बस वाहतूक ठप्प झाल्याने शहराबरोबर ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा फटका बसत आहे. शहरात कामासाठी येणारे सर्रास प्रवासी रात्रीच्या वस्तीच्या बसने गावाकडे जात असतात. मात्र, बसेस बंद असल्याने नागरिकांना लवकरच गाव गाठावे लागत आहे. सायंकाळी उशिराने धावणाऱया खासगी वाहनांची संख्यादेखील कोरोनामुळे कमी झाल्याने नागरिकांना घरी पोहोचण्यासाठी लवकरच सुटावे लागत आहे.









