प्रतिनिधी/ बेळगाव
बळ्ळारी नाल्याच्या पुरात एक तरुण वाहून गेला आहे. डुमउरबीनहट्टी (ता. गोकाक) येथे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून रविवारी त्या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. पाण्यात बुडालेला पंपसेट पाहण्यासाठी गेला असता ही घटना घडली आहे.
नागराज हेब्बळ्ळी (वय 19) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. दोन दिवसांपासून एसडीआरएफचे व अग्निशामक दलाचे जवान स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेत होते. रविवारी दुपारी वाहून गेलेल्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर अंतरावर झुडूपात अडकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
जोरदार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर आला आहे. डुमउरबीनहट्टी गावाजवळ नागराजचा पंपसेट पाण्यात बुडाला होता. तो पाहण्यासाठी नागराज शेतात गेला असता त्यावेळी अचानक पाण्याच्या प्रवाहात वाढ होऊन तो वाहून गेला होता. रविवारी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









