आमदार, शेतकरी संघटनेने घेतला पुढाकार : शेतकऱयांना मिळणार पीक नुकसानभरपाई
प्रतिनिधी / बेळगाव
मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसामुळे लेंडी नाला, बळ्ळारी नाला परिसरातील शिवारामध्ये पाणी शिरून शेतकऱयांच्या भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱयांवर आले आहे. शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी बेळगाव शेतकरी संघटनेने पाठपुरावा केला. त्यानुसार बुधवारी ड्रोनच्या साहाय्याने कृषी विभागाने बळ्ळारी नाला परिसरातील शिवाराचा सर्व्हे केला आहे.
मुचंडी ते अलारवाड आणि हलगा ते हिंद इंजिनिअरिंगपर्यंत ड्रोनद्वारे हा सर्व्हे करण्यात आला. बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्याच्या परिसरातील शेतकऱयांची जी पिके वाया गेली आहेत त्याचा सर्व्हे करण्यात आला. यावेळी आमदार अनिल बेनके, कृषी विभागाचे साहाय्यक संचालक आर. बी. नायकर, बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुका अध्यक्ष सुनील जाधव, सुनील खन्नुरकर, निळकंठ चौगुले, श्रीधर पद्मण्णावर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गसूचीनुसार सर्व शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळणार आहे. या सर्व्हेच्या माध्यमातून एकूण किती शेतकऱयांचे नुकसान झाले आहे, याची नोंद करून कृषी विभागाकडून नुकसानभरपाई मिळणार आहे. नाला परिसरातील दोन्ही बाजूंच्या शेतकऱयांनाही नुकसानभरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. सर्व्हे करण्यासाठी डी. बी. पाटील यांनी कृषी विभागाला आपला ड्रोन कॅमेरा दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून लेंडी नाल्याचे काम पूर्ण करावे, राष्ट्रीय महामार्गावर बॉक्स तयार करावेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होईल, अशी मागणी केली आहे. मात्र, अद्याप त्याबाबत गांभीर्य घेण्यात आले नाही. आता शहराला येणारा पूर कमी झाला तरी शेतकऱयांना मात्र अजूनही फटका बसत आहे. तेव्हा हे काम पूर्ण करावे, असे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी सांगितले.
भरपाई संदर्भात शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा…
बेळगाव, खादरवाडी, पिरनवाडी, मजगाव, अनगोळ, शहापूर, माधवपूर-वडगाव, जुने बेळगाव, खासबाग, अलारवाड, बसवण कुडची, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, बाळेकुंद्री बी. के., मोदगा, सुळेभावी, खणगाव बी. के., कणबर्गी, कलखांब, मुचंडी, अष्टे, चंदगड तसेच बळ्ळारी नाला परिसरातील येळ्ळूर, धामणे या शेतकऱयांनी नुकसानभरपाई संदर्भात अधिक माहितीसाठी बेळगाव शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱयांनी येताना सात-बारा उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक ही कागदपत्रे घेऊन भेटावे, असे कळविले आहे.









