प्रतिनिधी/ बेळगाव
लग्नाचे आमिष दाखवून शहर सशस्त्र दलातील एका पोलिसाने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शुक्रवारी महिला पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून त्या पोलिसाला अटक करण्यात आली आहे.
इम्रानखान अब्दुलमुनाफ घोरी (वय 29, रा. पोलीस क्वॉर्टर्स, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याच प्रकरणातील 23 वषीय तरुणीचीही वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या सशस्त्र दलातील पोलीस व पिडीत तरुणी दोघेही हुक्केरी तालुक्मयातील राहणारे आहेत. इम्रानखान हा सध्या पोलीस क्वॉर्टर्समध्ये राहतो. तर पिडीत तरुणीही बेळगावात राहते, अशी माहिती मिळाली आहे. गेल्या एक महिन्यांपासून हे प्रकरण ठळक चर्चेत होते.
यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली असून पिडीत तरुणीने एकदा आपले जीवन संपविण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र त्यावेळी यमकनमर्डी पोलीस स्थानकात हे प्रकरण दाखल करण्यात आले नाही. आता बेळगाव येथील महिला पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे.
इम्रानखान हा विवाहित आहे. त्याला दोन अपत्येही आहेत. ही गोष्ट लपवून ठेवून त्याने एका 23 वषीय तरुणीशी लगट केली होती. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. शेवटी या पोलिसाने लग्नास नकार दिल्याने तिने आपले जीवन संपविण्याचाही प्रयत्न केला होता. महिला पोलीस पुढील तपास करीत आहेत.









