प्रतिनिधी / महाड
गेल्या काहीं वर्षात जमिनीचे दर शहरी भागात प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असताना ग्रामीण भागातही जमिनीला आता सोन्यापेक्षा अधिक दर येऊ लागले आहेत. प्रचंड किंमतीच्या मोक्याच्या जमिनीची विक्री केली जात असताना अनेकदा फसवणूकही केली जाते. अशाच प्रकारे रायगड जिह्यातील पनवेल तालुक्यात विचुंबे गावांतील जमीन बनावट मुखत्यार पत्राचा वापर करुन एक कंपनीच्या भागीदारांना 17 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पनवेलमधील खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशापुरा रियल्टर्स या बांधकाम व्यावसायिक कंपनीतील राकेश संघवी या भागिदाराने वैंपनीच्यावतीने विकत घेतलेल्या जमिनीची परस्पर विक्री करुन अन्य भागीदारांची सुमारे 17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी राकेश संघवीसह जमीन विकत घेणाऱया नॅशनल बिल्डर्सच्या तीन संचालकांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपर येथे राहत असलेल्या विपुल पटेल आणि दीपक पटेल या बांधकाम व्यावसायिकानी 2007 मध्ये शेतजमीन विकत घेण्याचे ठरवले होते. राकेश संघवी पनवेल परिसरातील जमिनीचे व्यवहार करीत असल्याची माहिती पटेल बंधूना मिळाली होती. त्यांनी संघवीशी संपर्क साधला आणि जमीन खरेदी करण्याचे सांगितले. त्यावरुन पनवेल तालुक्यातील भिंगारी आणि विचुंबे या परिसरातील जमीन दाखवल्यानंतर खरेदी करण्याचे नक्की करण्यात आले. त्यासाठी नवीन कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. विपुल पटेल, दीपक पटेल व त्यांच्या कुटुंबियांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि मोहनलाल पटेल, धिरेन पटेल, दीपक पटेल, रितेश पटेल यांच्यासह राकेश संघवी यांनी एकत्र येऊन आशापुरा रियल्टर्स या भागीदारी कंपनीची स्थापना केली.
विचुंबे व भिंगारी या परिसरातील काही जमिनी भोगवटा वर्ग दोनच्या तसेच कुळ कायद्याच्या असल्याने रायगड जिल्हाधिकाऱयांच्या परवानगीची आवश्यकता होती. त्यासाठी खरेदी खत, साठेकरार, रजिस्ट्रशेन करण्यासाठी अलिबागला सर्वांना यावे लागेल, असे राकेश संघवीने सर्व भागीदारांना सागितले. सतत अलिबागला जाणे काही भागीदारांना शक्य होणार नसल्याने अखेर ही सर्व कामे पूर्ण करुन घेण्यासाठी कंपनीतर्फे संघवीला मुख्यत्यार पत्र देण्यात आले. त्यानंतर आशापुरा कंपनीने 13 शेतकरी आणि त्यांच्या कुटुंयांकडून जमीन खरेदी केल्या. या जमिनी खरेदी करताना राकेश संघवीच्या नावाने खरेदी करण्यात आल्या होत्या. यांतील काही जमिनी साठेकरार करण्यांत येऊन ताब्यात घेण्यात आल्या होत्या.
जमिनीचे सर्व व्यवहार राकेशच्या नावाने करण्यात आल्यामुळे तो सर्व व्यवहार पाहत होता. त्यामुळे जमिनीची सर्व कागदपत्रे राकेश संघवीच्या ताब्यात होती. विकत घेण्यात आलेल्या सर्व जमिनी कंपनीच्या नावे असल्याने आणि राकेश हा सर्व व्यवहार पाहत असल्याने इतर भागीदारांनी राकेशवर विश्वास ठेऊन वेगळे सातबारा काढले नाहीत. परंतु फेब्रुवारी 2020 मध्ये आशापुरा रियल्टर्स कंपनीच्या नावाने विचुंबे परिसरातील जमिनीची परस्पर विक्री करण्यात आल्याची माहिती कंपनीच्या अन्य भागीदारांना समजली. त्यांनी ऑनलाईनने जमिनीचे सर्व सातबारा उतारे काढल्यानंतर राकेश संघवी याने 2016/17 मध्ये विचुंबे येथील जमीन नॅशनल बिल्डरचे मालक एम. सन्नी, सिजो सन्नी, रसिका कोठारी यांना विकली असल्याचे आणि त्या सर्वाच्या नावे सातबाराचे उतारे करण्यात आल्याचे आढळून आले. या प्रकरणात राकेश संघवी याने बनावट अख्यात्यार पत्र तयार करुन सुमारे 17 कोटी रुपयांना विक्री केली. या जमीन व्यवहारामध्ये त्याने अन्य भागीदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आशापुरा कंपनीच्या पाच भागीदारांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कली. पोलिसांनी नॅशनल बिल्डर्सच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.









