बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे पैसे घेऊन बनावट कोरोना निगेटिव्ह अहवाल दिले जात आहेत. दरम्यान बेंगळूर अप्परपेट पोलिसांनी यासंबंधी कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी परप्रांतीय कामगारांना गावी परत जाण्यासाठी पैसे घेऊन बनावट कोरोना नकारात्मक अहवाल देत होता. अहवाल देण्यासाठी तो पाचशे ते एक हजार रुपये घेत होता. पोलिसांना याविषयी माहिती मिळताच त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्किपेट येथे राहणारा संपतलाल (वय ३२) यांने शहर रेल्वे स्थानकात गावी परतणाऱ्या प्रवासी कामगारांना नकारात्मक अहवाल देऊन गेल्या १५ दिवसांत लाखो रुपये मिळवले आहेत. त्याला अहवाल देण्यासाठी पाचशे ते एक हजार रुपये मिळत असत. यासाठी त्याने प्रसिद्ध संस्थांच्या नावांचे बनावट शिक्के वापरले. बनावट नकारात्मक अहवाल मिळाल्यानंतर बरेच परप्रांतीय प्रवासी कामगार आपल्या गावी परत आले आहेत. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकात बनावट नकारात्मक अहवालाची विक्री करताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले.









