डॉ. ग्रिष्मा गिजरे यांचे मत : मराठी साहित्य परिषद-जननी ट्रस्टतर्फे कर्तृत्ववान दहा महिलांचा सत्कार
प्रतिनिधी /बेळगाव
बदलती जीवनशैली, प्रदूषण व व्यसनाधिनता हीच वंध्यत्वाची कारणे आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाच्या राहणीमानात व आहारात बदल झाला आणि बैठी जीवनशैली वाढली. त्यामुळे वंधत्वाच्या समस्या निर्माण झाल्या, असे मत डॉ. ग्रिष्मा गिजरे यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्य परिषद व जननी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती वाचनालयाच्या डॉ. शकुंतला गिजरे सभागृहात कर्तृत्ववान दहा महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी वंध्यत्व या विषयावर डॉ. ग्रिष्मा यांचे व्याख्यान झाले. व्यासपीठावर डॉ. मंजुषा गिजरे, मीना खानोलकर उपस्थित होत्या. यावेळी डॉ. ग्रिष्मा म्हणाल्या, धावपळीच्या व तणावग्रस्त जीवनात वंध्यत्व वाढत आहे. मासिक पाळीची अनिश्चितता, असंतुलीत हार्मोन्स, इन्बॅलन्स आदी कारणे असून वेळेवर डॉक्टरांना भेटणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी सांगितले. दुसऱया सत्रात रुक्मिणी निलजकर, सरोज पाटील, सिफीया फर्नांडिस, ज्योती बामणे, श्रद्धा हेरेकर, लता पावशे, मनीषा नाडगौडा, सीमरन, सुधा भातकांडे, सुरेखा पाटील, जयश्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आशा पत्रावळी यांनी विणकर क्षेत्रात यश मिळवून विक्रम नोंदविल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नेत्रा मेणसे, सुधा माणगावकर व अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.