इंटरनेटच्या या युगात कोण कधी व्हायरल होईल याचा नेम नाही. आता तर केवळ माणूसच नव्हे तर प्राणी आणि पक्ष्यांच्या चित्रफिती देखली मोठय़ा प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलिकडेच एका बदकाच्या अनेक चित्रफिती व्हायरल झाल्या आहेत. या बदकाच्या चित्रफिती सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लोकप्रिय ठरत आहेत. या बदकाचे नाव मंचकिन असून ते सोशल मीडियावर डंकिन डक्स या नावाने प्रसिद्ध झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे बदक दर महिन्याला 3 लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहे.

मंचकिन या बदकावर त्याच्या मालकिणीचा मोठा जीव आहे. या बदकाची युटय़ूब, इन्स्टाग्राम आणि अन्य सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अकौंट असुन ते महिन्याला लाखो रुपये कमावत आहे. क्रिसी ऍलिस यांनी आपल्या बदकाचे नाव फास्ट फूड चेन डंकिन डोनट्सच्या नावावर डंकिन डक्स ठेवले आहे.
ऍलिस यांना पाळीव प्राणी खूप आवडतात. ती नेहमीच तिच्या पाळीव प्राण्यांसोबत चित्रफिती तयार करत असते. मात्र सर्वाधिक लोकप्रिय तिचे गोंडस बदक ठरले आहे. यामुळे ऍलिस नेहमीच बदकाच्या चित्रफिती पोस्ट करत असते. अत्यंत लोकप्रिय ठरलेले मंचकिन बदकाला आता स्पॉन्सर देखील मिळाले आहे. हे बदक आता प्रत्येक चित्रफितीमध्ये एका विशिष्ट कंपनीच्या उत्पादनांचे ब्रँडिंग करताना दिसते. यातून ऍलिसला चांगले उत्पन्नही मिळत आहे.









