चिपळूण नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव, व्यावसायिकांमध्ये नाराजी, दुसऱया दिवशीही कारवाई करताना पान विपेत्यांचा भर रस्त्यात तमाशा, वाहनाखाली झोपण्याचा केला प्रताप
प्रतिनिधी / चिपळूण
नगर परिषदेने शहरात राबवलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे पहिल्या दिवशी स्वागत झाले. मात्र या कारवाईत दुजाभाव केला जात असून बडय़ांना अभय दिले तर गरिबांना त्रास दिला जात असल्याचा आरोप आता नागरिकांसह व्यावसायिकांमधून होत आहे. दुसऱया दिवशी ही कारवाई करण्यात आली. यावेळी जुना बसस्थानक परिसरात एका पान विक्रेत्याने भर रस्त्यात तमाशा करत गाडीखाली झोकून दिले. मात्र त्याचे सर्वच साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शहरात दिवसेंदिवस भर रस्त्यातील अतिक्रमण वाढत चालले आहे. त्यामुळे वाहतूककोंडीने डोकेवर काढले असून त्याचा वाहन चालकांसह नागरिकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यातून होणाऱया तक्रारीतून बुधवारपासून मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे, नगर अभियंता परेश पवार, राजू खातू, वैभव निवाते, संदेश टोपरे, बापू साडविलकर, अमित महाडिक, विनायक सावंत, संतोष शिंदे आदींच्या पथकाने जेसीबी, वाहने व कर्मचाऱयांच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात केली आहे.
या पथकाने दोन दिवसात शहरातील भोगाळे, कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल, चिंचनाका, भाजीमंडई, पानगल्ली, पॉवरहाऊस, बहाद्दूरशेखनाका, बाजारपेठेतील रस्ते, शिवनदीपूल आदी परिसरातील अतिक्रमण हटवले आहे. मात्र काही भागातील बडय़ा व्यावसायिकांना स्वत: खोके काढून घेण्याची मुभा दिली. तरीही त्यांनी प्रशासनाला ठेंगा दाखवत दुसऱया दिवशीही खोके काढून घेतले नाही. तर दुसरीकडे बांगडय़ा विक्रेत्या महिलांना त्यांचे साहित्य उचलून घेण्यासही वेळ न देता त्यांच्याकडील साहित्याचा चक्काचूर करण्यात आला. त्यामुळे असा भेदभाव का, असा प्रश्न उपस्थित होत असून
दुसऱया दिवशीही नगर परिषदेने आपली मोहीम सुरू ठेवली. यावेळी बाजारपेठेसह बाजारपूल परिसरातील मच्छी व्यावसायिकांचे अतिक्रमण मोडीत काढण्यात आले. जुनाबसस्थानक परिसरात कारवाई करताना एका पानविपेत्या व्यावसायिकाने माजी नगरसेवक रमेश खळे यांची स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला. भर बाजारपेठेत साहित्य जप्त करण्यासाठी आणलेल्या वाहनाखाली झोपून त्याने तमाशा केला. मात्र त्याचे सर्व साहित्य या पथकाने जप्त केले. मात्र अशी धडक कारवाई करताना बडय़ांच्या खोक्यांना अभय देण्यात आले.
कोणालाही सूट देणार नाही- डॉ. विधाते
याबाबत मुख्याधिकारी डॉ. विधाते यांच्याशी सपर्क साधला असता ही मोहीम आता कायमच सुरू राहणार असून कोणालाही अभय देणार नसून काहींनी दिलेला शब्द पाळला नाही तर सरसकट कारवाई केली जाईल असे त्यांनी सागितले.









