प्रतिनिधी/ फलटण
शहरातील अर्धवट राहिलेली अतिक्रमण हटाव मोहीम पालिकेने तत्काळ चालू करावी. आतिक्रमण काढलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण झालेली ताडडतोब काढावीत, अन्यथा दिनांक 21 रोजी फलटण नगरपरिषदेसमोर (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात) बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हा उपध्यक्ष युवराज शिंदे व सामाजिक कार्यकर्ते मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी पंढरीनाथ साठे उपस्थित होते.
फलटण शहरातील अतिक्रमण मोहिम बरेच दिवसांपासून काही तांत्रिक कारणाने चालू होत नव्हती. परंतु सहा महिन्यांपूर्वी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी अतिक्रमण मोहिम चालू केली. त्यावेळी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, सर्वसामान्य जनतेने त्यांचे स्वागत केले. परंतु कोरोनाचे कारण पुढे करत अतिक्रमण मोहिम अर्धवट सोडण्यात आली. अतिक्रमण मोहिमेत पालिकेने गोरगरीब जनतेची अतिक्रमणे काढली, मात्र राजकीय बडय़ा धेंडाची अतिक्रमणे तशीच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब व्यवसायीक, जनतेमध्ये फलटण नगरपरिषदने अन्याय केल्याची भावना निर्माण झाली आहे. नगरपरिषदेने अतिक्रमण काढण्याची केलेली मोहिम म्हणजे फक्त दिखाऊपणा तर नाही ना ? असा सवाल निवेदनात उपस्थित केला आहे.
दरम्यान दैनिकाला दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये मुख्य अधिकाऱयांनी कोरोनाची दुसरी लाट संपल्यानंतर अतिक्रमण मोहीम पुन्हा चालू करणार असल्याचे सांगितले आहे. परंतु महाराष्ट्र शासन व आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाची दुसऱया लाटेबाबत कुठलेही सूतोवाच केले नसून उलटपक्षी महाराष्ट्र शासनाने शाळा, महाविद्यालय, मंदिरे, व्यवसायिक संकुले, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू केली आहेत. व नुकत्याच सार्वत्रिक निवडणुकाही पार पडल्या असून त्यामुळे मुख्यअधिकाऱयांनी दिलेले कारण म्हणजे पटण्याजोगे नसल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.
चौकट
नगरपालिकेने कोणतीही सबबी न सांगता अर्धवट राहिलेली अतिक्रमण मोहीम ताबडतोब चालू करून बडय़ा धेढय़ांसह सरसकट अतिक्रमणे काढावीत. अन्यथा दिनांक 21 रोजी फलटण नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे युवराज शिंदे व सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब खराडे यांनी निवेदनाद्वारे फलटण नगरपालिकेला दिलेला आहे.








