शेजवली येथील घटना : वनविभागाने घेतले ताब्यात
वार्ताहर / खारेपाटण:
जिल्हय़ात अनेक भागात बिबटय़ांचा वावर वाढला आहे. खारेपाटणनजीक शेजवली येथे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास बिबटय़ाचे दोन बछडे भरवस्तीत मुक्त संचार करत भर्डेवाडी येथील भर्डे यांच्या घरात घुसल्याने एकच गोंधळ उडाला. भर्डे कुटुंबीय व ग्रामस्थांनी आरडाओरड करताच हे दोन्ही बछडे घराच्या मागील बाजूस असलेल्या लाकडी माचाखाली जाऊन बसले.
बिबटय़ाचे दोन्ही बछडे घरात घुसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी त्वरित राजापूर येथील वन कर्मचाऱयांशी संपर्क साधून या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर राजापूर येथून दोन पोलीस अधिकारी व वन कर्मचारी शेजवली येथे दाखल झाले. सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री एकच्या सुमारास या दोन्ही बछडय़ांना पिंजऱयात जेरबंद करण्यात वन कर्मचाऱयांना यश आले.
बिबटय़ाच्या दोन्ही बछडय़ांना पकडण्यात आले तरी मोठय़ा बिबटय़ाचा अजूनही या परिसरात संचार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या मोठय़ा बिबटय़ाने आतापर्यंत शेजवली परिसरातील गुरांचा व पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. या बिबटय़ाचाही त्वरित शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी शेजवली ग्रामस्थांनी केली आहे.









