राज्य महिला महामंडळाचा तीन आंतरराष्ट्रीय कंपन्याशी करार
वारणानगर / प्रतिनिधी
महिला बचत गटाची उत्पादने आता सातासमुद्रा पलीकडे आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत विकली जाणार असून या संदर्भाने तीन आतंरराष्ट्रीय कंपन्याशी करार झाल्याची माहिती राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ तथा माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यानी दिली. राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्वव ठाकरे, महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने बचत गटाची उत्पादने आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत नेणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरले आहे.
दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक प्रदर्शन व विक्री महोत्सवात महाराष्ट्र शासनाने सहभाग नोंदविला १०o हुन अधिक देशांनी भाग घेतलेल्या या वर्ल्ड एक्स्पोत राज्याचे महिला आर्थिक विकास महामंडळ तथा माविमने चोख कामगिरी बजावत अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशा अशा माविमच्या विविध उत्पादनांचे सादरीकरण करून प्रदर्शनात वस्तूंची विक्री केली असल्याचे अध्यक्ष ज्योती ठाकरे यानी सांगीतले. दुबई येथील प्रदर्शनात ठाणे, पुणे,चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांतील माविम सलग्न बचत गटातील महिला निर्मित उत्पादने पाठविण्यात आली होती.
सदर एक्स्पो दरम्यान माविमने एकाचवेळी एलबीआय जनरल ट्रेडींग एलएलसी,बीबी ग्लोबल एफझेडई आणि सॅन बॅन बिझनेस कमर्शिअल इन्व्हेस्टमेंट एलएलसी या तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत करार केला असून त्यांच्यामार्फत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या कांदा,भाजीपाला,फळे,तांदूळ, गहू इत्यादी कृषिमालाची परदेशात निर्यात केली जाणार आहे. याकरिता लागणारे विविध परवाने,पॅकिंग, इतर तांत्रिक माहिती देण्याचे कामही या कंपन्या करणार आहेत. पहिल्या वर्षी ४२ टन उत्पादनाची निर्यात होणे अपेक्षित आहे असे अध्यक्ष ठाकरे यानी सांगीतले.माविमच्या अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे यांच्या पुढाकाराने व सहकार्याने व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी – शर्मा यानी हे करार केले असून माविमने प्रथमच अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय करार केले असून माविमच्या वाटचालीतील हे एक ऐतिहासिक पाऊल आहे असे अध्यक्ष ज्योती ठाकरे यानी सांगीतले.