वार्ताहर/ कुडची
अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने जास्तीत जास्त खबरदारी घेत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा बुधवारी बकरी ईद सण साधेपणाने साजरा करावा. यंदा ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार नाही, अशी माहिती कुडची पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड यांनी दिली.
कुडची पोलीस ठाण्याच्या आवारात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. उपनिरीक्षक शिवराज दरीगौड यांनी,, ‘बकरी ईद दिवशी नियमांचे पालन करत मशिदीमध्ये नमाज पठण करता येणार आहे. यावेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर तसेच सामाजिक अंतराचा नियम पाळावा लागणार आहे. मात्र यावेळी लहान मुलांसह वयोवृद्धांना हजर राहता येणार नाही. नमाज पठणासह व मशिदीमध्येही गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व नियमांचे पालन करून समाज बांधवांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोनामुळे नियमांचे पालन करण्याची ग्वाही शांतता कमिटीतील पदाधिकारी व मान्यवरांनी दिली. बैठकीस उपनगराध्यक्ष बाशालाल रोहिले, वक्फ कमिटी अध्यक्ष हुसेनबा चमनशेख, बाबाजान कालेमुंडासे, मोहदीनसा वाटे, फारूख सजन यांच्यासह शांतता कमिटी सदस्य व मान्यवर उपस्थित होते.









