कळंबा कारागृहातील 140, तर बिंदू चौकातील 24 बंदीजनांचा प्रश्न : कारागृह प्रशासनाचा आरोग्य विभागाकडे लसीकरणचा प्रस्ताव
आशिष आडिवरेकर/कोल्हापूर
शासनाच्या योजनेत नियमांचा अडथळा बनल्याच्या घटना काही नवीन नाहीत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱया लसीकरणापासून कळंबा व बिंदू चौक कारागृहातील बंदीजन वंचित राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही कारागृहातील 45 वर्षावरील 165 बंदीजनांचे लसीकरण करावे, अशी मागणी कारागृहाने आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र या बंदीजनांचे आधार कार्ड नसल्याने लसीकरणात अडथळा निर्माण झाला आहे.
कळंबा कारागृहामध्ये मुंबई, पुणे यासह राज्यासह देशभरातील नामचिन गुंड शिक्षा भोगत आहेत. खून, मारामारी, दरोडा यासह बॉबस्फोट अशा गंभीर घटनांमधील कैदी आहेत. कारागृहात 40 बॅराक तर 10 अंडा सेल आहेत. कळंबा मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 1800 असून यामध्ये 2200 हून अधिक बंदीजन शिक्षा भोगत आहे. यामध्ये 120 महिला बंदीजन आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 45 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना मोफत लसीकरण करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारने आरोग्य यंत्रणांना दिले आहेत. जिह्यात 234 केंद्रावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सुमारे 3 लाखाहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगणारे व अंडर ट्रायल असणाऱया 140 बंदीजनांना लसीकरण करावे. तसेच बिंदू चौक सबजेलमधील 24 बंदीजनांचे लसीकरण करण्यात यावे असा प्रस्ताव दोन्ही कारागृहांच्या वतीने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र या लसीकरणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. बंदीजनांचे आधार कार्ड, पॅनकार्ड नसल्याने आरोग्य विभागाने लसीकरण करण्यास नकार दिला आहे. लसीकरणाची ऑनलाईन माहिती भरताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे आधारकार्ड नसलेल्या बंदीजनांना लस देऊ शकत नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने कारागृह प्रशासनास कळविण्यात आले आहे. यामुळे आता या बंदीजनांचे लसीकरण करायचे कसे याचा प्रश्न कारागृह प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
नवीन बंदीजन आयटीआयमध्ये
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने खबदारीचा उपाययोजना म्हणून कळंबा कारागृहात येणाऱया बंदीजनांसाठी आयटीआय येथील इमारतीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारागृहाने मार्चपासून आयटीआयची एक इमारत ताब्यात घेतली होती. ही इमारत अद्यापही कारागृह प्रशासनाकडे आहे. नवीन येणाऱया बंदीजनांना या इमारतीमध्ये 14 दिवस ठेवल्यानंतरच त्यांना कळंबा कारागृहात पाठविण्यात येणार आहे.
बंदीजनांच्या नातेवाईकांना थेट भेट बंद, फोनवरुन संपर्क
बंदीजनांना त्यांच्या नातेवाईकांसोबत थेट भेटण्याची मुभा आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे. प्रत्यक्ष भेट बंद करुन बंदीजनांना नातेवाईकांशी केवळ फोनवरुन संपर्क करता येणार आहे. शिक्षा लागलेल्या बंदीजनांना 15 दिवसातून 1 वेळ 10 मिनिटे तर अंडर ट्रायल असणाऱया बंदीजनांना आठवडÎातून 1 वेळ 10 मिनिटे बोलण्याची मुभा असणार आहे.
लसीकरणसंदर्भात जिल्हा प्रशासनास कळवणार
कळंबा आणि बिंदू चौक सबजेलमधील बंदीजनांना कोरोनाची लस देण्यासंदर्भातील प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविला आहे. सध्या या बंदीजनांकडे आधार कार्ड नसल्यामुळे आरोग्य विभाग लसीकरणास नकार देत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला कळविण्यात येणार आहे. -चंद्रमणी इंदूरकर, अधीक्षक, कळंबा कारागृह
आरोग्य विभागाचे मौन
बंदीजनांच्या लसीकरणासंदर्भात जिल्हा आरोग्य विभाग व महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क केला असता दोन्ही यंत्रणांनी माहिती देण्यास नकार दिला. याबाबतची माहिती आमच्याकडे नसल्याचे संगितले. मात्र दोन्ही यंत्रणांनी आधारकार्ड सक्तीचे असल्याची मात्र माहिती दिली.









