धनखड यांनी राज्याला लोकशाहीसाठी गॅस चेम्बर संबोधिले
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील मतभेद संपण्याची चिन्हे नाहीत. राज्यपालांच्या नव्या ट्विटमुळे ममतांनी संतापून राज्यपालांचे अकौंटच ब्लॉक केले आहे. राज्यपाल धनखड यांनी रविवारी सोशल मीडियावर बंगालला लोकशाहीसाठी गॅस चेंबर संबोधिले होते. यामुळे नाराज होत ममतांनी हे पाऊल उचलले आहे.
राज्यपाल धनखड जवळपास दर दिनी काही न काही ट्विट करून मला किंवा माझ्या अधिकाऱयांच्या विरोधात टिप्पणी करतात. घटनाविरोधी आणि अनैतिक टिप्पणी त्यांच्याकडून केली जाते. ते निर्देश आणि सल्ला देतात, परंतु निवडून आलेले सरकार जणू वेठबिगार ठरले आहे, याचमुळे मी त्यांना स्वतःच्या ट्विटर अकौंटवरून ब्लॉक केले आहे. मी दरदिनी व्यथित होत असल्याचे ममतांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांनी हे पाऊल महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीवर राज्यपाल धनखड यांच्या नव्या ट्विटनंतर उचलले आहे. बंगालच्या पवित्र भूमीला रक्ताने माखलेली आणि मानवाधिकारांना चिरडण्याची प्रयोगशाळा होताना पाहू शकत नाही. राज्य लोकशाहीचे गॅस चेंबर ठरत चालल्याचे लोक म्हणू लागले आहेत असा ट्विट राज्यपालांनी केला होता.
वाद जुनाच
राज्यपाल धनखड आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वादांचे नाते तसे जुने आहे. यापूर्वी धनखड यांनी एका अन्य कार्यक्रमात बोलताना बंगालमध्ये कायद्याचे राज्य नाही, येथे केवळ शासकांचे राज्य असल्याचे म्हटले होते. कुठलाही अपमान मला स्वतःचे कर्तव्य बजावण्यापासून रोखू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. राज्याच्या सीमांवर बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढविण्यावरूनही दोघांमध्ये वाद झाला होता. आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किलोमीटरच्या अधिकारक्षेत्राचे बीएसएफकडून उल्लंघन होऊ नये हे सुनिश्चित करण्याचा निर्देश ममतांनी राज्य पोलिसांना दिला होत. त्यानंतर धनखड यांनी ममतांना पत्र लिहून विरोध दर्शविला होता.









