प्रतिनिधी/ पणजी
बंगालच्या खाडीत नव्याने तयार होत असलेले वादळ आणि कमी दाबाच्या पट्टय़ाचा परिणाम म्हणून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर जोरदार वादळी वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. समुद्र प्रचंड खवळलेला राहील. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा दिलेला आहे. अगोदरच 37 इंच अतिरिक्त ठरलेला पाऊस यंदा गोव्यात द्वितीय शतक पूर्ण करतोय की काय? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
गेल्या 4 दिवसांपूर्वी राज्यात पावसाने विश्रांती घेतली आणि अनेक दिवसांनी जनतेला सूर्यदर्शन झाले. आता पाऊस येणार नाही ही समजूत चुकीची ठरली. उलटपक्षी पावसाने आपला जोर वाढविला आहे. आगामी तीन दिवस गोव्यात मुसळधारपणे तो कोसळणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने सायंकाळी जारी केलेल्या इशाऱयानंतर पुढील तीन दिवस गोव्यात मुसळधारपणे पाऊस पडेल. त्याची सुरुवात गुरुवारी सायंकाळी झाली. बंगलाच्या खाडीत वादळसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. मोठय़ा प्रमाणात पावसाळी ढग तिथे जमलेले आहेत. हे ढग पश्चिमेच्या दिशेने सरकत असल्याने आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक व महाराष्ट्राला देखील पाऊस झोडपून काढणार आहे.
शुक्रवारी पणजीला काढले झोडपून
मान्सून सध्या सक्रिय झालेला आहे. अरबी समुद्रात सकाळी कमी दाबाचा एक पट्टा होता त्याचा प्रभाव किनारी भागात झाला. पणजीसह अनेक भागात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. गेल्या 24 तासात पणजीत एकूण 4 इंच पाऊस पडला. गुरुवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस शुक्रवारी रात्री 8.10 पर्यत चालूच होता. या दरम्यान साडेतीन इंच पाऊस पडला. तर दिवसभरात सायं. 5.10 पर्यंत आणखी 1 इंचापेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे एकूण 4 इंच पावसाने पणजीतील जनजीवन अस्ताव्यस्त झाले.
राज्यात यंदा सरासरीपेक्षा 37 इंच अधिक पाऊन
पणजीत पाऊस चालू असतानाच दुपारी हवामान खात्याने जनतेला सावधगिरीचा इशारा दिला. आगामी 2 ते 5 दिवसांपर्यंत मुसळधार तथा अतिवृष्टीचा इशारा दिला. सध्या पडत असलेल्या पावसाने राज्यातील नद्या दुथडी भरून वहात आहेत. आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याने राज्यात पूरसदृष्य स्थिती उद्भवण्याची भीती आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 37 इंच जादा पाऊस झालेला असून यंदा पाऊस इंचाची द्विशतकी पार पडणार असेच दिसते.
गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस पणजीत कोसळला. पेडणेमध्ये 1 इंच, जुने गोवे अर्धा इंच, सांखळी अर्धा इंच, दाबोळी, वाळपई दीड इंच, मडगाव अर्धा इंच, मुरगाव 2 इंच, केपे 1 इंच, सांगे अर्धा इंच एवढी पावसाची नोंद झाली.
सर्वाधिक पावसाचा विक्रम पेडणेचा
दरम्यान गोव्यात यंदा सर्वाधिक पावसाची नोंद पेडणे येथे झाली आहे. पेडणेत आतापर्यंत 181 इंच पावसाची नोंद झालेली आहे. त्या खालोखाल सांखळी व केपे या दोन केंद्राचा क्रमांक लागतो. सांखळी व केपे, वाळपई येथे आतापर्यंत प्रत्येकी 161 इंच एवढा विक्रमी पाऊस कोसळला आहे. अद्याप मान्सूनचा मोसम संपण्यास आणखी 12 दिवस आहेत. त्यातच मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिलेला आहे.









