दापोली पोलिसांकडून दोघे संशयित ताब्यात
वार्ताहर / टाळसुरे
बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेले 55 लाख 50 हजार रुपये एटीएममध्ये न भरता त्याचा अपहार केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
दापोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, डोंबिवली या कंपनीकडे दापोली व खेड येथील बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम देण्यात आले आहे. या कंपनीत प्रथमेश शिर्के (रा. तळे-खेड) आणि अमोल नाचरे (रा. उंबर्ले-दापोली) हे दोन कर्मचारी काम करत होते. कंपनीमधून पैसे घेऊन एटीएममध्ये भरण्याचे काम या दोघांमार्फत केले जात होते. 11 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत स्टेट बँकेच्या 2 एटीएम मशीनमध्ये व ऍक्सिस बँकेच्या 3 एटीएम मशीनमध्ये कंपनीने दिलेल्या पैशांपैकी 55 लाख 50 हजार रुपये त्यांनी एटीएममध्ये न भरता परस्पर लंपास केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. याबाबत रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापक देवेंद्र चुडे यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार दापोली पोलिसांनी प्रथमेश शिर्के व अमोल नाचरे यांना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडूनही पैशांच्या अपहारप्रकरणी चौकशी सुरू आहे. 55 लाख 50 हजार रुपये या दोघांनी लंपास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरीही यामागे मास्टर माईंड वेगळेच असल्याची माहिती पुढे येत आहे.
दोन्ही संशयित दापोली पोलिसांना सहकार्य करीत असल्यामुळे या प्रकरणातील खरे गुन्हेगार लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे. 55 लाख 50 हजार एवढी रक्कम एकाचवेळी काढण्यात आली होती की कसे, तसेच ही रक्कम या संशयितांकडे आहे की आणखी कोणाकडे त्यांनी दिलेली आहे. त्यांच्याकडून रक्कम किती हस्तगत करणे शक्य आहे, आदी गोष्टींचा तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत. दोन्ही संशयितांना सोमवारी दापोली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तक्रार दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे यांनी तत्काळ दोन्ही संशयितांना ताब्यात घेतल्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाणे शक्य होणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत.









